धुळे : सर्वसामान्यांच्या हक्काच्या कामासाठी पैशांची मागणी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. धुळे येथील जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयातील कनिष्ठ लिपीक प्रमोद पाटील आणि प्रकल्प सहायक इम्रान अन्सारी यांना ९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांच्या मेहुण्याच्या (शालकाच्या) ओबीसी जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी २१ जुलै २०२५ रोजी ऑनलाइन अर्ज करण्यात आला होता. आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे जिल्हा जात पडताळणी समिती, धुळे कार्यालयाकडे जमा केली होती. सुनावणी दरम्यान सर्व पूर्तता करूनही पडताळणी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात होती. तक्रारदार वारंवार कार्यालयात फेऱ्या मारत असताना, या कामासाठी लाचेची मागणी करण्यात आली.
प्रकल्प सहायक इम्रान अन्सारी याने हे काम करून देण्यासाठी सुरुवातीला १२ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ३ हजार रुपये त्याने आधीच 'फोन पे'च्या माध्यमातून स्वीकारले होते. मात्र, दोन महिने उलटूनही काम न झाल्याने तक्रारदार पुन्हा कार्यालयात गेले. तिथे त्यांची भेट कनिष्ठ लिपीक प्रमोद पाटील याच्याशी झाली. पाटील याने "पैशांशिवाय काम होणार नाही" असे स्पष्ट सांगत पुन्हा १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर वैतागलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, एसीबीने सापळा रचला. तडजोडीअंती ९ हजार रुपये देण्याचे ठरले. प्रकल्प सहायक इम्रान अन्सारी याने ही रक्कम स्वीकारली, तर लिपीक प्रमोद पाटील याने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहित केले. दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने इम्रान अन्सारी याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले.
ही कारवाई उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली. या पथकात राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के यांसह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.