धुळे : भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण राज्यभरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 31 मे रोजी होणारी त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर 21 ते 31 मेदरम्यान धुळे शहर व जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतून अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी कार्याची आणि समाजासाठीच्या योगदानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा भाजपचा उद्देश आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते डॉ. लक्ष्मण सावजी यांनी यासाठी कार्यकर्त्यांनी व्यापक जनसहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
धुळ्यात आमदार अनुप अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यशाळेत प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, गजेंद्र अंपळकर, डॉ. सुशील महाजन, हिरामण गवळी, जयश्री अहिरराव, अल्पा अग्रवाल, महादेव परदेशी आदींचा समावेश होता.
अहिल्यादेवींच्या कार्यावर आधारित बुकलेट्स, पत्रके
जनसंपर्क व सांस्कृतिक कार्यक्रम
मंदिर व घाट स्वच्छता मोहीम
चित्ररथ मिरवणुका, लोककला सादरीकरण
शाळा- महाविद्यालयांमध्ये निबंध, वक्तृत्व, क्वीझ स्पर्धा
परिसंवाद, चर्चा, महिला व युवा मेळावे
मॅरेथॉन, पथनाट्य व व्याख्याने, चर्चासत्र
आमदार अनुप अग्रवाल यांनी अंबोडे व आर्वी येथील मंदिर आणि पुलांच्या जीर्णोद्धारासह, धुळे शहरातील स्मारक विकासकामे पुढील जयंतीपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच 31 मे रोजी जनसंपर्क कार्यालयात विशेष कार्यक्रम होणार असून, टॉवर बगीच्यातील स्मारकाजवळ प्रदर्शनी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.