Banjara community agitation
धुळे : आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला असून, आज (दि.८) धुळे शहरात मोठ्या उत्स्फूर्ततेने महामोर्चा काढण्यात आला. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात मोडत असल्याचे ठोस पुरावे शासनाकडे असतानाही सरकार या मागणीवर चालढकल करत असल्याचा आरोप या मोर्चातून करण्यात आला. समाजाच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची विनंती जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.
बंजारा आरक्षण कृती समिती आणि बंजारा समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. बंजारा आरक्षण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुधीर जाधव यांच्या नेतृत्वाखाली जवाहर पवार, अनिल पवार, डॉ. साईदास चव्हाण, अॅड. राहुल जाधव, नवल पवार, कैलास जाधव तसेच हजारो समाजबांधव सहभागी झाले. सकाळी अकरा वाजता मालेगाव रोडवरील श्री अग्रसेन महाराज पुतळा चौकातून मोर्चाची सुरुवात झाली. आग्रा रोड, कराचीवाला खुंट, जुनी आणि नवी मनपा मार्गे जात मोर्चा जेल रोडवर पोहोचला आणि तेथे सभेत रूपांतरित झाला.
सभेत मान्यवरांनी भाषण करताना शासनावर अन्यायाचा आरोप केला आणि “हैदराबाद गॅझेट”नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती ‘ब’ प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी केली. समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
सध्या बंजारा समाज भटक्या जमाती-अ प्रवर्गात असून, नॉन-क्रीमीलेअरची अट लागू आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा मर्यादित लाभच मिळत असून, नोकरी आणि शिक्षण क्षेत्रात संधी कमी आहेत. इतर समाजांतील घुसखोरीमुळे पात्र घटक वंचित राहत आहेत, त्यामुळे समाजात तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर आजचा मोर्चा केवळ आरक्षणासाठी नव्हे, तर समाजाच्या स्वाभिमानाच्या पुनर्स्थापनेसाठी असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.
मोर्चातील वक्त्यांनी सांगितले की, हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा मूळ आदिवासी समाज असल्याचे ऐतिहासिक नोंदींमध्ये स्पष्टपणे नमूद आहे. तरीही राज्य सरकार या संदर्भात मौन बाळगून आहे. या मागणीमुळे विद्यमान अनुसूचित जमाती प्रवर्गातील कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न पोहोचता बंजारा समाजाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.