धुळे : शहरालगत महिंदळे शिवारात पांझरा नदीपात्रात सुमारे एक किलोमीटर लांबीचा व 12 ते 15 फूट उंचीचा गॅबियन दगडी बंधारा उभारून नदीचे पात्र बाधित करण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने हा प्रकार उघडकीस आणत नदीपात्र गिळंकृत केल्याचा आरोप केला आहे.
माजी आमदार अनिल गोटे यांनी घटनास्थळी पाहणी करून भूमाफियांना सत्ताधारी पक्षाचे पाठबळ असल्याचा आरोप केला आहे. सन 2015 मध्ये गरीबांसाठी सोसायटी स्थापन करण्यासाठी परवानगीचा अर्ज दाखल झाला होता; मात्र आता अचानक बंधाऱ्याद्वारे शेतजमीन नदीपात्रापर्यंत वाढवण्याचे काम सुरू झाल्याचे शिवसेनेने निवेदनाद्वारे म्हणणे मांडले आहे.
पत्रकार परिषदेत गोटे यांनी धुळे शहरात गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन, शासनाला रॉयल्टी न देणे, तसेच नदीपात्र बाधित करण्याचे प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुरू असल्याचा आरोप केला आहे.
घटनास्थळी आंदोलन करताना शिवसैनिकांनी प्रांताधिकारींवरही संताप व्यक्त केला. त्यांनी बंधाऱ्याजवळील शेकडो ब्रास दगडांचा पंचनामा करण्याची मागणी केली आहे. हा बंधारा नकाने गावाजवळील बेघर वस्तीस संभाव्य धोका निर्माण करू शकतो, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली असून, दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.