महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला.   (छाया : यशवंत हरणे)
धुळे

Dhule | जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर : पालकमंत्री जयकुमार रावल

Maharashtra Day | नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी तत्पर : पालकमंत्र्याची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जिल्हावासियांचे जीवनमान सुकर होण्यासाठी सदैव तत्पर राहीन, अशी ठाम ग्वाही राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापनादिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी आमदार अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, सीमा अहिरे, संजय बागडे, महादेव खेडकर, कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, तहसिलदार अरुण शेवाळे, पंकज पवार, अपर तहसिलदार वैशाली हिंगे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले की, महाराष्ट्र राज्याला संत, महापुरुषांच्या विचारांचा समृद्ध असा वारसा लाभला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-किल्ले या ऐतिहासिक ठेव्याची साक्ष देतात, संत-महंतांच्या विचारांचा, आणि कवी गोविंदाग्रज ऊर्फ राम गणेश गडकरी यांच्या कवितांचा उल्लेख करत त्यांनी राज्याचा सांस्कृतिक ठेवा अधोरेखित केला. मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी 105 हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करत त्यांनी हुतात्मा चौकातील स्मारकाला अभिवादन केले. याशिवाय, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने अनेकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

यांचा झाला सन्मान

यावेळी आदर्श तलाठी पुरस्कार राकेश भोई, धुळे पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश देवरे, सुधीर सोनवणे, पोलीस हवालदार ललीत पाटील, कांतिलाल अहिरे, विशाल मोहने, महिला पोलीस उप निरिक्षक लक्ष्मी करंकार, पोलीस कॉन्स्टेबल योगेश ठाकूर, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 चे सहायक पोलीस उपनिरिक्षक विशाल पाटील यांना पालकमंत्री रावल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

खेळाडूंसह मार्गदर्शकांचाही सन्मान

शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे द्वारा सन 2023-2024 व सन 2024-2025 या वर्षांसाठी खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा गुणवंत खेळाडु (महिला) पुरस्कार पुर्वा दिलीप निकम, जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून राजेंद्र बळीराम शिंदे, जिल्हा गुणवंत खेळाडू (पुरुष) पुरस्कार प्रथमेश अमरीश देवरे, जिल्हा गुणवंत खेळाडू (महिला) पुरस्कार नुराधा दिलीप चौधरी, जिल्हा गुणवंत दिव्यांग खेळाडू राहुल ईश्वर बैसाणे, जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार सुकदेव गोरख भिल यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे द्वारा सन 2023-2024 व सन 2024-2025 या वर्षांसाठी खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

सन 2022-2023, 2023-24, 2024-2025 वर्षासाठी युवक, युवती व संस्थांना जिल्हा युवा पुरस्कार जाहीर झाला यात जिल्हा युवा पुरस्कार (युवती) ॲड. शितल जावरे, जिल्हा युवा पुरस्कार (युवक) सागर राजेंद्र पटेल, जिल्हा युवा पुरस्कार (युवती) कु.सुवर्णा भालचंद्र देसले, जिल्हा युवा पुरस्कार (युवक) प्रकाश शरद पाटील, जिल्हा युवा पुरस्कार (युवती) वृंदावन भीमराव पाटील तसेच जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) इंदीरा महिला मंडळ वलवाडी ता.जि.धुळे अध्यक्षा प्रभा परदेशी यांना पालकमंत्री रावल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT