धुळे

धुळे : पिंपळनेर येथे बनावट देशी दारूचा कारखाना उद्धवस्त

गणेश सोनवणे

पिंपळनेर, (जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील पिंपळगाव वडपाडा येथे पोलिसांनी बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 10 लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबधित बातम्या :

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पिंपळगाव वडपाडा येथील एका घरात बनावट देशी दारू तयार केली जात आहे. या माहितीच्या आधारे, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनी श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला. यावेळी, सुदाम उत्तम सूर्यवंशी (रा. पिंपळगाव वडपाडा) आणि विशाल विनायक वाघ (रा. मोगलाई, धुळे) हे दोघे देशी बनावटीची टंगो पंच दारू तयार करत असताना रंगेहाथ पकडले गेले. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 10 लाख 47 हजार 15 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत संशयित आरोपींनी देशी दारू कंपनीच्या नावाचा वापर करून कंपनीची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी सुदाम सूर्यवंशी, विशाल वाघ, आण्णा पाटील (रा. सांगवी, ता. शिरपूर) आणि छोटू राजपूत (रा. शिरपूर) अशा चौघांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आण्णा पाटील आणि छोटू राजपूत हे दोघे फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT