धुळे : अजमेर येथून दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविकांच्या इनोव्हा कारला शिरपूर फाट्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. दरम्यान मयत हे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र जखमी आणि मयतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या संदर्भात शिरपूर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर शहरा नजीकच्या फाट्यावर एमएच 05 सी व्ही 1001 या क्रमांकाच्या इनोव्हा कारला भीषण अपघात झाला. ही कार मध्य प्रदेशातून धुळे शहराकडे येत होती. मात्र कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे कार वरून अचानक नियंत्रण सुटले. त्यामुळे दुभाजक तोडून विरुद्ध बाजूला एका धावत्या ट्रकवर ही कार जाऊन आदळली.
त्यामुळे कारमधील दोघे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच भाविक देखील जखमी झाले आहेत.हा अपघात होताच महामार्गावरील वाहन चालकांनी तसेच नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात रवाना केले आहे. मयत हे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली असली तरीही पोलिसांनी कागदपत्रांच्या आधारावरून या मयतांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान या संदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.