धुळे : धुळे तालुक्यात प्रचंड गारपीट आणि वादळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला सरसकट नुकसान भरपाई मिळावी म्हणून माजी आ. कुणाल पाटील यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि कृषीमंत्र्यांची भेट घेतली. गारपीट, वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना देण्यात याव्यात आणि तत्काळ सरसकट मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पंचनामा करुन नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरकार वार्यावर सोडणार नाही, आर्थिक मदत निश्चितपणे करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे धुळे तालुक्यातील शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचीही भेट घेवून महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनाम्याचे आदेश देवून नुकसान भरपाई मिळावी म्हणून निवेदन दिले.
धुळे तालुक्यात झालेल्या गारपीट, वादळाचा तडाखा आणि बेमोसमी पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच जोरदार वादळामुळे शेतकर्यांच्या सौर कृषी पंपांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने पंचनामा करून शेतकर्यांना त्वरीत सरसकट नुकसान भरपाई मिळावी म्हणून कुणाल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मुंबईत भेट घेतली.
यावेळी कुणाल पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत मिळण्याबाबतचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि कृषी मंत्री यांना आपले पत्रही दिले. त्यांनी धुळे तालुक्यातील नुकसानीची माहिती देतांना सांगितले की, धुळे तालुका हा अवर्षण प्रवण भागात मोडला जातो. नैसर्गिक आपत्तीबरोबरच कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाच्या दुहेरी संकटाशी शेतकरी लढत असतो. धुळे तालुक्यात दि. 19 मार्च आणि दि. 30 मार्च 2026 रोजी शेतकर्यांवर नैसर्गिक संकट ओढावले. प्रंचड झालेली गारपीट, अवकाळी पाऊस,वादळाचा तडाखा यामुळे शेतकर्यांच्या रब्बी हंगामाचे तसेच फळपिके व भाजीपाल्याची मोठी हानी झाली आहे. वादळाच्या तडाख्याने पिके आडवी पडून जमीनदोस्त झाली, फळबागा उद्ध्वस्त झाल्या. वादळामुळे शेतकर्यांच्या सौर कृषी पंपाचेही मोठे नुकसान झाले आहे. गारपीटमुळे कांद्याची पात तुटून भूईसपाट झाली आहे तसेच गारपीटीच्या तडाख्यात टरबूजचे मोठे नुकसान झाले आहे. मका, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, पपई, केळी, डाळींब, आंबे, शेवगा यांच्यासह फळपिके व भाजीपाला यांना गारपीटीचा फटका बसला आहे. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हीरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नैसर्गिक संकटामुळे रब्बी पिकांचे नुकसान होवून उत्पन्नात मोठी घट होणार आहे, परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, म्हणून धुळे तालुक्यातील शेतकर्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी कुणाल पाटील यांनी यावेळी केली.
गारपीट, वादळाचा तडाखा आणि बेमोसमी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि कृषीमंत्र्यांना दिली. तसेच त्यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून पत्रही दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आपले सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते. नैसर्गिक आपत्तीत बळीराजाला वार्यावर सोडणार नाही. पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यात येईल, त्यामुळे शेतकर्यांनी धीर सोडू नये, असे सांगत त्यांनी बळीराजाला दिलासा दिला आहे.
दरम्यान महसूल व कृषी विभागास युध्दपातळीवर पंचनामा करण्याच्या सूचना देवून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशीही मागणी कुणाल पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.