धुळे : धुळे जिल्ह्यात तीन नगरपरिषद आणि एक नगर पंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात भारतीय जनता पार्टीचाच वरचष्मा राहिला आहे. जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषद माघारी यापूर्वीच बिनविरोध झाली असून पिंपळनेर, शिरपूर वरवाडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भारतीय जनता पार्टीने विजय मिळवला आहे. तर शिंदखेडा नगर पंचायतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.
विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. जिल्ह्यातील 50 जागा भारतीय जनता पार्टी ,आठ जागा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची शिवसेना, चार जागा अजित पवार राष्ट्रवादी तर काँग्रेस, एमआयएम आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. तर दोन ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली आहे. विशेषता धुळे जिल्ह्यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भोपळा देखील फोडता आला नाही.
धुळे जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये बिघाडी झाली. त्यामुळे सर्वच ठिकाणी युती होऊ शकली नाही. राज्याच्या राजकारणात हातात हात घालून चालणाऱ्या पक्षांनी निवडणूक प्रचारात एकमेकांच्या विरोधात भूमिका मांडली. महाविकास आघाडीने देखील एकला चलो रे ची भूमिका घेतली. पण आता निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचेच वर्चस्व सिद्ध झाले आहे. चार पैकी तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपली शक्ती सिद्ध केली आहे. तर एका ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपले वर्चस्व सिद्ध केले. महाविकास आघाडी मात्र आपला करिष्मा दाखवू शकली नाही.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या मुदतीत दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद बिनविरोध झाली. यासाठी राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली. शिंदखेडा तालुक्यात माजी मंत्री हेमंतराव देशमुख आणि मंत्री जयकुमार रावळ यांच्या गटात विळ्या भोपळ्याचे वैर आहे. मात्र या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही गटांना एकत्र आणण्यात मंत्री रावळ यांना यश आले. त्यामुळे त्याचा परिणाम यापूर्वी दिसून आला. या नगरपरिषदेच्या सर्व 26 जागा बिनविरोध झाल्या. तर नगराध्यक्ष पदावर राज्याचे मंत्री जयकुमार रावळ यांच्या मातोश्री नयनकुवर रावळ यादेखील बिनविरोध झाल्या. या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी चौथ्यांदा विराजमान होण्याचा सन्मान सौ नयन कुवर रावळ यांना मिळाला.
हा निकाल पाहता मंत्री जयकुमार रावळ यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा नगरपंचायतीत देखील भारतीय जनता पार्टी एकहाती विजय मिळवेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण प्रत्यक्ष निकालात या नगर पंचायतीमध्ये 17 पैकी 11 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकून देखील नगराध्यक्ष पदावर मात्र त्यांना पराभवाचा फटका सहन करावा लागला. या नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा चौघांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कलावती माळी यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला. भारतीय जनता पार्टीच्या रजनी वानखेडे आणि शिवसेनेच्या मनीषा पाटील यांना पराभवाचा झटका बसला. त्यामुळे या नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीने एक हाती बहुमत मिळवून देखील नगराध्यक्ष पद मात्र त्यांना गमवावे लागले.
शिरपूर वरवाडे नगर परिषदेत देखील राज्याचे माजी मंत्री अमरीश पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या नगरपरिषदेसाठी भारतीय जनता पार्टी कडून आमदार अमरीश पटेल यांचे पुत्र चिंतन पटेल हे रिंगणात होते. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत पाटील यांनी निवडणूक लढवली. या नगर परिषदेच्या सर्व सोळा वार्डामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने प्रचाराची राळ उठवली. मात्र नगराध्यक्ष पदावर चिंतन पटेल हे 16959 मतांनी विजयी झाले. विशेष म्हणजे ही नगरपरिषद भारतीय जनता पार्टीने एक हाती हातात घेतली आहे. अवघी एक जागा एमआयएमने मिळवली आहे.
अन्य पक्षाला येथे खाते उघडणे देखील शक्य झाले नाही. गेल्या वेळी याच नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे 21 भारतीय जनता पार्टीचे चार तर अपक्ष पाच असे नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यावेळी आमदार अमरीश पटेल हे काँग्रेसमध्ये असल्यामुळे त्यांनी आपला राजकीय करिष्मा दाखवला होता. त्यानंतर आमदार अमरीश पटेल यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. परिणामी काँग्रेसचा या नगरपरिषदेमधून सुपडा साफ झाला. तर मतदारांनी पुन्हा आमदार अमरीश पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.
पिंपळनेर नगर परिषदेची निवडणूक आमदार मंजुळा गावित यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. त्यामुळे त्यांनी आग्रह करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पिंपळनेर येथे घेतली. या सभेमध्ये राज्य सरकारने जनतेसाठी राबवलेल्या योजनांचा पाढा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वाचला. पिंपळनेर नगर परिषदेच्या 18 जागांसाठी निवडणूक झाली. यात राज्याच्या सत्तेत हातात हात घालून राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मतभेद झाले. त्यामुळे दोघांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. यात निकाला अंती भारतीय जनता पार्टीने आठ आणि शिंदे यांच्या शिवसेनेने आठ जागा मिळवल्या. तर दोन ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली. यापैकी एका अपक्षाने भारतीय जनता पार्टीला लगेचच पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे या नगर परिषदेमध्ये बहुमत झाले आहे.
विशेष म्हणजे प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीत शिंदे सेनेच्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाच्या जागेवर पराभव पत्करावा लागला. येथून भारतीय जनता पार्टीच्या योगिता चौरे या विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिंदे सेनेच्या ललिता प्रेमानंद गायकवाड, राष्ट्रवादीच्या संजना अशोक सोनवणे आणि काँग्रेसच्या प्रतिभा प्रकाश चौरे यांचा पराभव केला आहे.