धुळे: राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून आणि माध्यमातून अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यातून गोरगरीब व सर्वसामान्य लोकांच्या प्रगतीचे भरीव काम सुरु आहे. या भरीव कामांचे प्रतिबिंब निवडणूकांमध्ये पडणार आहे. शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणूकीत सतराच्या सतरा उमेदवार निवडून आणायचे आहे. एका जागेसाठी दोन चार इच्छुक असतात. एकाला उमेदवारी मिळाली. अन उर्वरीत इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही. तर नाराज होवू नये. त्यांना पक्ष येणार्या काळामध्ये शंभर टक्के चांगली संधी देईल. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली सतराही जागांवरील उमेदवार निवडून येतील. पुन्हा भाजपाचाच झेंडा राहील, असा आत्मविश्वास आमदार राम भदाणे यांनी व्यक्त केला.
शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात शिंदखेडा नगरपंचायत निवडणूकीची सहविचार सभा झाली. आमदार राम भदाणे अध्यक्षस्थानी होते. यावेळी भाजपाचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, माजी नगराध्यक्ष अनिल वानखेडे, जिल्हा सरचिटणीस डी. एस. गिरासे, भाजपा शहराध्यक्ष संजयकुमार महाजन, मनोहर पाटील, दीपक देसले, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आर. के. माळी आदी उपस्थित होते. आमदार राम भदाणे पुणे म्हणाले की, भाजपातील इच्छुकांनी कार्य कर्तृत्वाचा लेखाजोखा अहवाल मांडायचा आहे. त्यांनी पक्षासाठी, त्या त्या प्रभागातील केलेले काम, विधानसभा निवडणूकीत केलेले काम आदींचा हमखास विचार केला जाईल. कोणतीही निवडणूक असो. तिला सहज सोपी समजू नका. आपल्याच हातात आहे. असे समजू नका. प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे. दुर्लक्ष करू नका. प्रत्येकाला जवळ करा. एकेकाचे मत महत्वाचे असते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून विजय साकारला जात असतो.
शिंदखेडा विधानसभा मतदार संघात माजी आमदार अण्णासाहेब (कै.) द. वा. पाटील यांचा शिंदखेडा तालुक्यासह धुळे व नंदुरबार जिल्ह्यात दांडगा संपर्क होता. त्यांनी लोकोपयोगी कामे केली. जनसामान्यांशी नाळ जोडलेली होती. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी माझ्यावर धुळे जिल्हा भाजयुमोची जबाबदारी टाकली होती. त्यावेळेस पुर्ण जिल्ह्यात विधायक उपक्रम राबविले. सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचलो. अन विजय साकारला. आम्ही खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत आहोत. शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणूकीत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनातून अन कुशल नियोजनातून महाविजय साकारण्यासाठी कटीबध्द होण्याचे आवाहन आणि मुलमंत्र आमदार भदाणे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
भाजपा शहराध्यक्ष संजयकुमार महाजन यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा चिटणीस प्रवीण माळी यांनी आभार मानले. दरम्यान नगराध्यपदासाठी माजी नगराध्यक्ष रजनी वानखेडे. मीरा पाटील, सुरेखा देसले, रजूबाई माळी, उषाबाई चौधरी आदी पन्नासपेक्षा अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या.