लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोष केला. pudhari photo
धुळे

Railway News | मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्वेला मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

धुळे : मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला आता फायनल लोकेशन सर्वेला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग खऱ्या अर्थाने मार्गी लागला आहे. आता या रेल्वे मार्गाची फाईल केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या टेबल पर्यंत पोहोचली असून आर्थिक मंजुरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केल्यास हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यास कोणतीही अडचण नाही, अशी माहिती आज लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. यापूर्वी दिल्लीत असणाऱ्या धुळ्याच्या नेतृत्वाने या रेल्वे लाईनचा प्रश्न संपवल्यात जमा केला होता. मात्र आपण पाठपुरावा करून तो जिवंत केल्याचे देखील गोटे यांनी म्हटले आहे.

धुळे येथील कल्याण भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांनी मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्वेला मंजुरी मिळाल्याची माहिती देताच लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोष केला. यावेळी मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करणारे सेंधवा येथील मनोज मराठे यांच्यासह लोकसंग्रामचे तेजस गोटे, माजी नगराध्यक्ष हेमा गोटे, जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाणे, अविनाश लोकरे, प्रकाश महानोर, किशोर चौधरी, शरद बोरसे, मनेश थोरात, प्रकाश जाधव, नंदू भामरे, नाना थोरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी या रेल्वे मार्गासाठी केलेल्या संघर्षाची माहिती दिली. गेल्या 100 वर्षापासून ही मागणी प्रलंबित होती. तर 45 वर्षापासून आपण यासाठी लढा देत आहोत. या मागणीसाठी आपण अभूतपूर्व मनमाड पासून इंदोर पर्यंतचा मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे प्रशासनाला हादरा बसला. आपण प्रयत्न केल्याने रेल्वेच्या पिंक बुक मध्ये ॲटम नंबर सात वर या रेल्वे मार्गाचा अंतर्भाव केला गेला. मात्र माजी खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी चौथ्या सर्वेचा विषय मध्ये टाकून या रेल्वे मार्गाच्या प्रश्नाचा बट्ट्याबोळ केला. बोरवीहीर ते नरडाणा हा रेल्वे मार्ग मनमाड इंदूरचा भाग नसताना आभास निर्माण केला गेला. मात्र आपण देखील या सर्वांना अंधारात ठेवून रेल्वे बोर्डाकडे आपला पाठपुरावा सुरू ठेवला. यासाठी भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सकट सर्वपक्षीय नेत्यांनी मदत केली. त्यामुळे आता रेल्वे मार्गासाठी वेगवेगळ्या तांत्रिक समितीच्या बैठका पार पडल्या. यानंतर आता फायनल लोकेशन सर्वेला मंजुरी मिळाली असून हा प्रश्न रेल्वे बोर्डाकडे सुपूर्द झाला आहे. आता या रेल्वे मार्गासाठी आर्थिक मंजुरीची आवश्यकता आहे. या रेल्वे मार्गाचे फाईल केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या टेबल पर्यंत पोहोचली असून त्यांच्याकडे पाठपुरावा झाल्यास या रेल्वे मार्गास आर्थिक मंजुरी मिळून मनमाड इंदूर रेल्वेमार्ग प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यास कोणतीही अडचण राहणार नाही, अशी माहिती देखील यावेळी गोटे यांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT