धुळे: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा धुळे दौऱ्याचा पहिला दिवस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाने गाजला. ते थांबलेल्या हॉटेलला घेराव घालत पदाधिकाऱ्यांनी रादीनाम्याच्या घोषणाने परिसर दणाणून सोडला. आंदोलनामुळे कोकाटे हॉटेलमध्येच अडकून पडले होते. त्यांचा धुळे जिल्हा दौरा अजिबात होऊ देणार नाही, असा इशारा या दोन्ही पक्षांनी दिला.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे शुक्रवारी (दि.25) जिल्हा दौऱ्यानिमित्त धुळ्यात दाखल झालेत. ते सकाळी दहा वाजेला गुलमोहर शासकीय विश्रामगृहात येणार होते. शासकीय स्तरावरून त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र मंत्री कोकाटे यांना राज्यभरामधून होणारा विरोध पाहता धुळ्यात त्यांना आंदोलनाचा फटका बसू नये, यासाठी ऐनवेळी विश्रामगृहातील त्यांचा मुक्काम बदलण्यात आला. त्यांची थांबण्याची व्यवस्था भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हॉटेल टॉपलाईन येथे करण्यात आली. मात्र ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मिळाताच त्यांनी तेथे जात या हॉटेलला घेराव घालत आंदोलन केले. पोलीसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हॉटेलच्या आवारात जाण्यापासून रोखले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलबाहेर रस्त्यावर काळे झेंडे व पत्त्यांच्या माळा दाखवून प्रचंड घोषणाबाजी करत कोकाटे यांच्या दौऱ्याला विरोध केला.
राज्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत आहे. शेतकरी आत्महत्या वाढत आहे. मात्र अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याऐवजी कृषीमंत्री जंगली रमी खेळण्यात व्यस्त आहे. यातून त्यांची असंवेदनशीलता दिसून येते . त्यांनी दौरा करण्याऐवजी रमीचा गेम मांडावा. व राजीनामा द्यावा, अशी टीका यावेळी भोसले यांनी केली.
हॉटेल टॉपलाईनबाहेर शिवसेनेचा ठाकरे गट देखील आक्रमक झाला. यावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगरप्रमुख धीरज पाटील, भरत मोरे आदींनी काळे झेंडे दाखवत निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी शिवसैनिकांनी हातात फलक घेऊन त्यावरील संदेशांद्वारे आपला रोष देखील व्यक्त केला. त्यांना धुळे दौरा करू देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला. शेतकऱ्यांना नाही कोणतीही हमी, आम्ही खेळतो जंगली रमी, अशा आशयाच्या घोषणा देत मंत्री कोकाटे यांचा दौऱ्याला शिवसेनेने विरोध दर्शवला आहे.