धुळे: माजी आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील गदारोळावर उपरोधिक टीका केली आहे. जनतेच्या ज्वलंत प्रश्नांऐवजी निरर्थक मुद्द्यांवर गदारोळ घालणाऱ्या नेत्यांवर त्यांनी निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी "व्ही.आय.पी. मानसोपचार रुग्णालय" याची गरज असल्याचे उपरोधाने म्हटले आहे.
गोटे यांनी आरोप केला की, अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी औरंगजेबाची कबर, 'वाघ्या' कुत्र्याची समाधी आणि दिशा सालियान प्रकरणावर वादंग माजवला जात आहे. तसेच सत्ताधारी व विरोधक दोघेही जनतेच्या प्रश्नांपासून दूर असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. "राज्याच्या हितासाठी महत्त्वाचे प्रश्न सोडून निरर्थक चर्चेसाठी वेळ खर्च केला जात आहे. यामुळे अशा मानसिक संतुलन बिघडलेल्या नेत्यांसाठी विशेष रुग्णालय हवे," असे गोटे यांनी उपरोधाने म्हटले आहे. त्यांच्या या टीकेने राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.