Shirpur taluka 12 lakh ganja seizure
धुळे : शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम असणाऱ्या वाडी सुमऱ्या पाडा शिवारात गांजाची शेती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नष्ट केली. या कारवाईत सुमारे 12 लाख रुपये किमतींची 600 किलो गांजाची रोपे जप्त करण्यात आली आहेत. एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वाडी सुमऱ्या पाडा शिवारात जितु शिकाऱ्या पावरा, (रा.वाडी ता. शिरपूर) हा कसत असलेल्या शेत जमिनीवर मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे झाडांची अवैधरित्या लागवड केली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना देण्यात आली.
त्यामुळे त्यांनी तातडीने गांजाची शेती नष्ट करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कारवाईसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाला कारवाईसाठी रवाना करण्यात आले. यात शिरपुरचे पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोउनि. सुरेश सोनवणे तसेच आरीफ पठाण, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, पवन गवळी आदी पथकाला रवाना करण्यात आले.
शेत हे अतिशय दुर्गम भागात होते. त्याठिकाणी पोलिसांनी 3 किलो मीटर अलीकडे वाहने थांबवून दोन डोंगर पार करुन कारवाई केली आहे. या पथकाने छापा टाकला असता जितु शिकाऱ्या पावरा हा कसत असलेल्या तुर व कपाशी पिकाच्या आत शेतजमिनीवर अंदाजे 3 ते 5 फुट उंचीचे गांजाची झाडे लागवड केल्याचे मिळून आले. शेतातून सुमारे 12 लाख रूपये किंमतीचा 600 किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थ वनस्पतीचे ओले, ताजे झाडे जप्त करण्यात आले आहे. यासंदर्भात जितु शिकाऱ्या पावरा याच्याविरुध्द शिरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.