उत्तर महाराष्ट्र

दै. पुढारी इम्पॅक्ट : नगरसूल आठवडे बाजार पर्यायी जागेत; घेतला मोकळा श्वास

अंजली राऊत

नाशिक (नगरसूल) : भाऊलाल कुडके

येथील येवला – नांदगाव राज्य मार्ग क्रमांक 25 वरील वळणावर भरणार्‍या आठवडे बाजारामुळे होणार्‍या वाहतूक कोंडीसह बाजारकरूंच्या जीविताला निर्माण होणार्‍या धोक्याबाबत दै. 'पुढारी'मध्ये वृत्त प्रकाशित होताच हा बाजार पर्यायी जागेत स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नगरसूल : 28 मे रोजीचा रस्त्यालगतचा आठवडे बाजार.

येथे मोठ्या प्रमाणात बाजार भरत असून विक्रेत्यांची संख्या व ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी व भरेकरी, भाजीपाला विक्रेते तसेच इतर वस्तू विक्रेते अक्षरशः येवला-नांदगाव राज्य मार्गावरील वळणावर साइडपट्ट्यांच्या आत बसत. यामुळे रस्त्याच्या एका बाजूला बाजाराची गर्दी व दुसर्‍या बाजूला दुचाकी व चारचाकी वाहनांची गर्दी होती. या राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने सर्वांच्याच जिवाला धोका निर्माण झाला होता. येथील गर्दी पाहून नगरसूल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी तसेच बाजार वसुली ठेकेदार व त्यांचे कर्मचारी यांनी वारंवार सूचना केल्या पण हे विक्रेते हटण्यास तयार नव्हते. याबाबत वृत्त व बाजार रस्त्यावर भरत असल्याचे छायाचित्र प्रकाशित केले होते. त्याचा परिणाम म्हणून पहिल्याच शुक्रवारी बाजार वसुली ठेकेदार सुदाम गादीवर, शुभम पैठणकर, अमोल पैठणकर यांनी रस्त्यालगत बसणार्‍या विविध विक्रेत्यांना पर्यायी जागा देऊ स्थलांतरित केले. रस्त्यावर भाजीपाला विकणार्‍या शेतकर्‍यांना बाजार ओट्यावर जागा उपलब्ध करून दिल्याने रस्त्यावरील गर्दी पूर्णपणे नष्ट होऊन रस्ता मोकळा झाला.

ग्रामपंचायत प्रशासन, पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने हा रस्त्यावरील बाजार हटविण्याचा खूप वेळा प्रयत्न केला. मात्र 'दै. पुढारी' च्या बातमीमुळे हा अपघाती कॉर्नर विक्रेत्यांपासून मुक्त झाला. त्यामुळे दैनिक पुढारीचे खूप-खूप आभार. – सुदाम गादीकर, बाजार वसुली ठेकेदार नगरसूल.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT