जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव शहरातील एका मंगल कार्यालयात धर्मांतरांचा प्रयत्न हिंदुत्ववादी संघटनांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
शहरातील मंगलम मंगल कार्यालयात धर्मांतर सुरू असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाप्रमुख ह.भ.प.योगेश महाराज यांना मिळाली. त्या ठिकाणी काही लोक हिंदू धर्माबद्दल चुकीची माहिती देत होते. पैशांचे आमिष दाखवून बंजारा व भिल्ल समाजातील नागरिकांचा धर्मातरांचा प्रयत्न सुरू होता. त्यांचे धर्मांतरासाठी मत परिवर्तन करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू असल्याचे दिसून आले. ही बाब ह.भ.प.योगेश महाराज यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना सांगितले.
विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, विश्व हिंदू परिषदेचे धर्मप्रसार जिल्हाप्रमुख हरीश कोल्हे, बजरंग दलाचे महानगरप्रमुख समाधान पाटील मंगलम मंगल भवन येथे आले. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्या ठिकाणाहून हिंदू बांधवांचे धर्मांतर करणार्या केरळच्या चार जणांना ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत गवळी यांनी याठिकाणी भेट दिली.