उत्तर महाराष्ट्र

Bogus Doctor : मालेगावच्या बोगस डॉक्टरवर कारवाई

गणेश सोनवणे

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. त्याअंतर्गत कोणत्याही प्रकारची वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नसतानाही दातारनगरमध्ये दवाखाना चालविणार्‍या इसमाविरोधात पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, दंडात्मक कारवाई झाली आहे.

प्रशासक भालचंद्र गोसावी यांच्या आदेशान्वये महानगरपालिका क्षेत्रातील हॉस्पिटल, क्लिनीक, लॅब, डेकेअर सेंटर यांची तपासणी केली जात आहे. शासनाची मान्यता प्राप्त पदवीधारकांना खासगी वैद्यकीय व्यवसाय करताना मुंबई नर्सिंग होम अधिनियम 1949 च्या कलम 5 अन्वये नोंदणी करणे आवश्यक आहे. ती नसणार्‍यांविरोधात कारवाई केली जात आहे. दातार नगरच्या 60 फुटी रोडवर खदीजा हज्जीन इमदादी नावाचा दवाखाना चालविणार्‍या अन्सारी मोहम्मद वसीम हाजी अब्दुल रशिद याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा नोंदणीपत्र मिळून आले नाही. त्यावर दंडात्मक कारवाई करीत पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला. खासगी व्यवसाय करणार्‍या डॉक्टरांनी आपले दवाखाने, क्लिनीक, लॅब, हॉस्पिटल यांची नोंदणी व नुतनीकरण करावेत तसेच दर्शनी भागात वैद्यकीय वैद्य परवाने, दाखले, प्रमाणपत्रक निर्देशित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज मनपात रक्तदान शिबिर
मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि. 17 ते 1 ऑक्टोबर या कालावधीत रक्तदान शिबिर मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या 22 तारखेला जुन्या मनपा आयुक्त कार्यालयात आरोग्य विभागातर्फे सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत शिबिर घेतले जाणार आहे. त्यात इच्छुक नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी केले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT