नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लालफीत, दफ्तर दिरंगाई या शब्दांना हद्दपार करत सर्वसामान्यांच्या सुखासाठी काम करताना राज्याच्या प्रगतीची गती कायम ठेवा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील 18 पुरस्कारांचे गुरुवारी (दि.21) वितरण करण्यात आले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासनचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राजकीय नेतृत्व हे राज्याच्या हिताची आणि विकासाची स्वप्ने दाखवतात. पण ती सत्यात उतरवण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेला करावे लागते, असे उद्गार त्यांनी काढले. प्रशासनात काम करताना अनेक अडचणी व आव्हाने समोर येतात. पण त्यातही प्रशासन किती सुलभतेने काम करत आहे याचे उदाहरण देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात सुलभपणे केलेल्या कर्जमुक्तीचा उल्लेख केला.
महसूलमंत्री थोरात यांनी मार्गदर्शन करताना प्रशासनात सहजता, गतिमानता, पारदर्शकता असली पाहिजे. त्यासाठी कालानुरूप प्रशासनात बदल केले जातात. महसूल विभागात अनेक योजना राजस्व अभियानअंतर्गत राज्यभर राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला.