कारवाई लपवून लाटले प्रमोशन Pudhari
अहिल्यानगर

Zilha Parishad Promotion Scam : कारवाई लपवून लाटले प्रमोशन; जिल्हा परिषदेत पदोन्नती घोटाळा

शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी पदोन्नतीमध्ये तर ज्यांच्या स्वाक्षरीने पदोन्नत्या केल्या

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्हा परिषदेतील पदोन्नतीची प्रक्रिया नेहमीच चर्चेत असते. त्यात आता शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी पदोन्नतीमध्ये तर ज्यांच्या स्वाक्षरीने पदोन्नत्या केल्या, त्या सीईओंचीच दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी एका शिक्षिकेला पदोन्नती देण्यासाठी प्रशासनाने तिला पुन्हा मुख्याध्यापक पदावर दाखवून निवड सूचीत त्यांचे नाव घातले. एवढेच नाही तर संबंधित शिक्षिकेवर तत्कालीन सीईओंनी वेतनवाढ रोखण्याची कारवाई केलेली असतानाही ती माहिती लपवून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. (Ahilyanagar News Update)

याबाबतची माहिती अशी की, जिल्हा परिषदेतून विस्तार अधिकारी पदासाठी पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी पदवी, बीएड, सेवाज्येष्ठता इत्यादीचा विचार करण्यात आल्याचे सांगितले जाते. या वेळी पाच जणांची विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती झाली. यामधील एका शिक्षिकेची पदोन्नती मात्र शिक्षण वर्तुळात चर्चेचा विषय आहे.

पदोन्नती यादीसाठी 1 जानेवारी 2025 ची सेवाज्येष्ठता यादी गृहीत धरली आहे. तसेच 24 मार्च 2025 रोजी पदोन्नतीची निवड यादी तयार करण्यात आलेली आहे. या पदोन्नती दि. 29 जुलै 2025 रोजी देण्यात आल्या. पदोन्नतीमध्ये एका शिक्षिकेचाही समावेश आहे. संबंधित शिक्षिका उंबरे शाळेवर मुख्याध्यापिका असल्याचे निवडयादीत दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात त्या उंबरे येथून 2023 मध्येच केंद्रप्रमुखाची पदोन्नती घेऊन देवळाली प्रवरा येथे हजर झाल्या.

एवढेच नाही तर देवळाली प्रवरातील एका प्रकणात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी चौकशी समितीचा अहवाल लक्षात घेता त्यांना दोषी ठरवत 19 मार्च 2024 रोजीच्या आदेशान्वये त्यांच्यावर एक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपात रोखण्याची कारवाई केली आहे. याची सेवापुस्तकात नोंद घेण्याच्याही सूचना केल्या होत्या. असे असतानाही शिक्षण विभागाने दि.24 मार्च 2025 रोजी निवड यादी बनविताना त्यात संबंधित शिक्षिकेचे नाव समाविष्ट केले. तसेच देवळालीची कारवाई लपविण्यासाठी पुन्हा उंबरेच्या मुख्याध्यापक पदावर दाखवले, तेथीलच सेवाज्येष्ठता दाखवत त्यांना ही पदोन्नती देण्यात आली आहे. कदाचित, पारदर्शीपणे ही प्रक्रिया राबवली असती तर एका अन्य शिक्षकाला ही संधी मिळाली असती, असे शिक्षक खासगीत बोलत आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी नुकताच पदभार घेतला आहे. त्यांच्या स्वाक्षरीने पाच जणांच्या यादीत ‘त्या’ शिक्षिकेला विस्तार अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र त्यांच्यापासूनही काही गोष्टी अंधारात ठेवून त्यांची दिशाभूल करणार्‍या जबाबदार यंत्रणेवर काय कारवाई केली जाणार, याकडे लक्ष असणार आहे.

पदोन्नती यादीमधील नीलिमा गायकवाड यांची वेतनवाढ रोखण्याबाबत कारवाई झालेली आहे. गटशिक्षणाधिकार्‍यांनी समुपदेशनाच्या दिवशी याबाबत माहिती देणे अपेक्षित होते. त्यांनी ती माहिती दिलेली नाही. हा प्रकार गंभीर असून, याप्रकरणी दोघांनाही नोटीस बजावली जाईल तसेच पदोन्नती रोखण्याबाबत कार्यवाही केली जाईल.
संभाजी भदगले, कक्ष अधिकारी, शिक्षण विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT