पाथर्डी: तब्बल पाच वर्षे कुलूपबंद अवस्थेत एका अंधाऱ्या खोलीत कैद ठेवलेल्या तरुणाची स्नेहालय संचलित स्नेह मनोयात्री पुनर्वसन केंद्राच्या रिस्क टीमने सुटका केली. या तरुणाचा नव्या आयुष्याकडे प्रवास घडवून आणत स्नेहालयाने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक हे दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील एका वाडीमध्ये नातलगांकडे गेले असता, त्यांनी संबंधित तरुणाबाबत चौकशी केली. त्यावेळी उघड झाले की, त्याला तब्बल सहा वर्षांपासून घरातच एका छोट्याशा खोलीत बंदिस्त करून ठेवले आहे. मानसिक रोगामुळे त्याच्यावर पुणे येथे उपचार झाले होते. (Latest Ahilyanagar News)
मात्र, अपेक्षित सुधारणा न झाल्याने घरच्यांनी त्याला कायमस्वरूपी एका खोलीत बंद केले. खोलीला बाहेरून कुलूप लावले. फक्त वरच्या छोट्याशा खिडकीतून त्याला अन्न-पाणी दिले जात होते.
या पाच वर्षांच्या काळात त्याला घरच्यांनी, अगदी आईसह प्रत्यक्ष पाहिलेही नव्हते. तो जिवंत आहे की नाही, याची देखील खात्री नव्हती. ही धक्कादायक माहिती मिळताच संबंधित पोलिस अधिकाऱ्याने स्नेहालयशी संपर्क साधला.
त्यानंतर संस्थेच्या सोनाली साळवे, सोनू शहा, अमय पुंड, गणेश धारकर आणि रमाकांत दोड्डी यांच्या रिस्क पथकाने धाडसी मोहीम राबवली. बाहेरून लावलेले कुलूप खोलून प्रवेश केला. तेव्हा सर्वत्र कचरा, दुर्गंधी आणि अमानवी वातावरण होते. त्या खोलीत हा तरुण जिवंत राहण्यासाठी झुंजत होता.
या खोलीतच तो पाच वर्षांपासून जेवणासह सर्व विधी करीत होता. माणूस म्हणून जगण्याची कसलीही परिस्थिती नव्हती. तरीही त्या चार भिंतींत त्याने कसाबसा श्वास घेतला. अखेर स्नेहालयच्या टीमने त्याला बाहेर काढून स्नेह मनोयात्री पुनर्वसन केंद्रात दाखल केले.