तरुणाई व्यसनांच्या आहारी  pudhari
अहिल्यानगर

गांजा, पेट्रोल, व्हाईटनर अन् बरेच काही ! ; तरुणाई व्यसनांच्या आहारी

काहीजण अक्षरशः पेट्रोलची नशा करताना दिसून येत आहेत

पुढारी वृत्तसेवा

कमीत कमी श्रमात मिळणारे जास्त पैसे, सहज मिळणारे व्यसनांचे साहित्य, पालकांचे दुर्लक्ष, पोलिसांचेही अवैध धंद्यांना असलेले अभय, इत्यादी कारणांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढताना दिसत आहे. ही किशोरवयीन मुले गांजा, सुलेषण, व्हाइटनर, बंटा तर काहीजण अक्षरशः पेट्रोलची नशा करताना दिसून येत आहेत. उत्तर नगर जिल्ह्यात विशेषतः शिर्डी, कोपरगाव परिसरातही व्यसनाधीन होऊन पुढे गुन्हेगारीत उतरणार्‍या तरुणाईची संख्या अधिक दिसत आहे.

कधी काळी नशा म्हणजे देशी किंवा विदेशी दारू तर, ग्रामीण भागात हातभट्टीची दारू चर्चेत होती. मात्र सध्या किशोरवयीन मुलांमध्ये गांजाचे व्यसन वाढले आहे. याशिवाय, गांजा, बंटा, गोळी सोलेशन, पेट्रोल हुगुने, व्हाईटनर अशा विविध नशेचा समावेश आहे. यात जे तरुण ही नशा करतात, ते तरुण वास येऊ नये म्हणून देखील काळजी घेतात. डोळे लाल दिसतात म्हणून आय ड्रॉप, पांढरे दिसू नये म्हणून बाम, तोंडाचा वास येऊ नये म्हणून मेट्रोची पट्टी किंवा सिंघमची सेवन, गांजा ओढण्यासाठी चिलीम ऐवजी गोगोची नळकांडी या सर्व साहित्याचा वापर तरुणाई करत आहे.

विशेष म्हणजे हे सर्व साहित्य कुठेतरी लपून ठेवून निवांतपणे व्यसनासाठी वापरले जाते. त्यांना लागणारे हे साहित्य ज्या परिसरात ते शिक्षण घेतात त्या परिसरातील पान टपर्‍या, जनरल स्टोअर, मेडिकलचे दुकाने, काही आयुर्वेदिकच्या नावाखाली औषधी विकणारी मंडळी उपलब्ध करून देतात.चौकटः गुन्हेगारीत 12 ते 18 वयोगटातील तरूण! शिर्डीत व्यसनाधिनतेमुळे खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, जबरी चोरी, मोबाईल चोरी, बॅगा पळवणे, पैशासाठी एखाद्यावर हल्ला करणे अशा घटना देखील घडत आहेत.

तरुणात दिसणारी लक्षणे

ओठ पांढरे होणे, डोळे लाल होणे, जेवन न करणे, अशक्तपणा, डोक्यावर केस वाढवणे, भाईगिरीची हवा, विसराळुपणा, किरकोळ कारणावरून राग येणे, डोळे खोल जाणे, असंदर्भिय चर्चा इत्यादी लक्षणे दिसत असल्यास पालकांनी जागरूक रहावे.

पालकांनी ही काळजी घ्यायला हवीच!

व्यसनाच्या आहारी गेलेली ही अल्पवयीन तरुणाई तहान भूक विसरून भटकताना दिसते. कधी निवांतपणे एखाद्या इमारतीच्या गॅलरीत, कधी नदी पात्राच्या कडेला किंवा काटवणात, झाडाखाली, मंदिरात, मोकळ्या मैदानावर ते उपाशीपोटी झोपलेले दिसतात. आपला मुलगा कोठे गेला, त्याचे मित्र कोण, दिलेल्या पैशाचा वापर कशासाठी करतो, घरातून पैसे तर लंपास होत नाही ना, मोबाईल किंवा सायकल चोरी गेली असे सांगुन व्यसन तर करत नाही ना, घरातून आठ दहा तास जातो तरी कोठे, जेवण न करता झोपी का जातो, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

‘त्या’ आयुर्वेदिक गोळ्यांमधूनही नशा!

आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली बंटा गोळी विकणार्‍या टोळ्या देखील वाढत आहेत. पूर्वी हमाली काम करणारे श्रमजीवी ‘बंटा’ खाऊन जड पोती उचलून ट्रक खाली करत होते. त्यामागे किती कष्ट केले हि जाणीव होऊ नये म्हणून ते बंटा खात होते. आता मात्र श्रम न करता कमी वयातील मुले याच्या आहरी गेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT