नगर: शादी डॉट कॉम बेवसाईटवरून पीडित महिलेशी संपर्क साधत तिला लग्नाचे आमिष दाखविले. घर घेण्यासाठी तिच्याकडून एक लाख 80 हजार रुपये घेतले. केडगाव येथे तिच्यावर अत्याचार करून पुन्हा पैशाची मागणी केली. तिने पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विनोद प्रतापसिंग लल्लनसिंग रजपूत (रा. एकदंत कॉलनी, सारसनगर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले की, पीडित महिला हावडा (पश्चिम बंगाल) येथील आहे. तिच्या पहिल्या लग्नाचा घटस्फोट झाल्याने तिने दुसरे लग्न करण्यासाठी शादी डॉट कॉमवर प्रोफाईल अपलोड केली. त्यामुळे विनोद रजपूत याने तिच्याशी संपर्क केला. (Latest Ahilyanagar News)
त्यानेही दुसरे लग्न करायचे आहे, असे सांगितले. तो सतत पीडितेबरोबर फोनवर बोलत असे. त्यानंतर हावडा येथे पीडितेच्या घरी बोलणे झाले. तो नगरमध्ये काम करीत असून, पेटिंगचा व्यवसाय असल्याचे त्याने सांगितले. नवीन घर घेतल्यानंतर लग्न करू, असेही तो म्हणाला. नवीन घरासाठी त्याने एक लाख 80 हजार रुपये घेतले.
दरम्यान, विनोद रजपूत 5 मार्च 2025 रोजी हावडा येथे आठ दिवस राहण्यासाठी होता. त्यामुळे त्यांचे चांगलेच प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर 1 एप्रिल 2025 रोजी पीडिता विनोदला भेटण्यासाठी हावडा येथून नगरला आली.
केडगाव शास्त्रीनगर येथे भाड्याच्या घरामध्ये राहिली. याच काळात त्याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा हावडा येथे गेले. विनोद घर घेण्यासाठी पुन्हा पैसे मागू लागला. त्यास नकार दिला असता त्याने अत्याचार केल्याचे व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेने पुन्हा नगरला येऊन लग्नाबाबत विचारले असता त्याने नकार देत पीडितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.