राहुरी: अहिल्यानगर दक्षिणेची जलदायिनी असलेल्या मुळा धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडण्यात आले, परंतू शासकीय परिचलन अध्यादेशानुसार 16 ते 31 जुलैपर्यंत धरण साठ्यात 21 हजार 809 दलघफू (84 टक्के) पाणी साठा स्थिर राखणे महत्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर धरणाच्या दरवाजांमधून सोडलेले पाणी थांबविले जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुळा धरणाचा साठा 18 हजार 226 दलघफू स्थिर ठेवून, मुळा पाटबंधारे विभागाकडून धरणात साठणारे अतिरीक्त पाणी दरवाजांसह डाव्या व उजव्या कालव्यातून सोडले जात आहे, परंतू शासनाच्या जलाशय परिचलन अध्यादेशानुसार मुळा धरणाचा पाणी साठा 1 ते 15 जुलै या काळात 18 हजार 200 दलघफू राखणे गरजेचे होते. (Latest Ahilyanagar News)
यानुसार धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर होताच, 9 जुलै रोजी दरवाजे उघडण्यात आले. मुळा धरणाच्या दरवाजांमधून 3 हजार ते 1 हजार क्यूसेकप्रमाणे पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे. मंगळवारी 15 जुलै रोजी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये काही प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याचे पाहता विसर्ग 2 हजार क्यूसेकने वाढविण्यात आला.
दरवाजांमधून जायकवाडीच्या दिशेने पाणी वाहताना शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. डावा कालवा 100 क्यूसेक तर, उजवा कालवा 400 क्यूसेकने वाहत आहे. दोन्ही कालव्यांमधून शेतीसाठी आवर्तन मिळत असताना, उजव्यातून अद्याप 103 दलघफू तर, डाव्या कालव्यातून शेती शिंचणासाठी 14 दलघफू पाणी सोडले आहे. दरम्यान, शेतकर्यांची मागणी सुरू असेपर्यंत शेती सिंचनाचे आवर्तन सुरूच राहणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे.
मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस पडत नसताना, पाणलोट क्षेत्रावर पावसाची अवकृपा दिसत आहे. धरणात अपेक्षेपेक्षा अधिक पाणी जमा झाल्याने शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील व शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांच्या नियोजनानुसार धरणाच्या दरवाजांमधून सोडलेल्या विसर्गाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
धरणाकडे 2, 247 क्यूसेक आवक!
मुळा धरणातून सुरू आवर्तन पाहता धरणाचा साठा 18 हजार 226 दलघफू असा स्थिर आहे. दरवाजांमधून 2 हजार क्यूसेकने, डावा 100 तर, उजवा कालवा 400 क्यूसेकने वाहत आहे. धरणाकडे काल (15 जुलै) रोजी सायंकाळी 2 हजार 247 क्यूसेक प्रवाहाने पाण्याची आवक सुरु होती. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर आषाढी सरी रिमझिम स्वरूपात हलक्या कोसळत आहेत. लाभक्षेत्रातील राहुरीत मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. पावसाने पूर्णतः उघड घेतल्याने या परिसरात आभाळ- उन्हाचा खेळ सुरू आहे.
‘शासनाच्या जलाशय परिचलन आदेशानुसार मुळा धरणाचा साठा 21 हजार 809 दलघफू करण्यासाठी दरवाजांमधून सोडलेला विसर्ग थांबविला जाणार की नाही? याबाबत मुळा पाटबंधारे प्रशासनाचा अद्याप निर्णय झाला नाही. याबाबत कार्यकारी अभियंता सायली पाटील यांचा आदेश महत्वाचा ठरणार आहे. पाणी साठा राखण्याचा निर्णय होताच, मुळा पाटबंधारे प्रशासन योग्य तो निर्णय घेणार आहे.- राजेंद्र पारखे, शाखा अभियंता, मुळा धरण