वन्य प्राण्याच्या अधिवासात मानवाने प्रमाणापेक्षा जास्त केलेला हस्तक्षेप, जंगल, ओसाड भागात वाढत्या लोकवस्त्या, वाढलेली शेतीकरण यामुळे मानवासह वन्यप्राण्याच्या जीवाला धोकादायक ठरताना दिसत आहे. यामुळेच आपला भूभाग, प्रदेश सोडून वन्यप्राणी विशेष करून बिबटे अन्न, पाण्याच्या शोधार्थ आपला अधिवास सोडून मानवी वस्त्यामध्ये शिरताना दिसत आहेत. यामुळे मानवासह या प्राण्यांच्या जिवाला देखील धोका निर्माण झाला आहे. अनेकदा जखमी, अपंग अवस्थेत आढळणार्या या प्राण्यासाठी नगरच्या वन विभागाच्या वतीने राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूरच्या 10 हेक्टर क्षेत्रावर वाईल्ड ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (वन्यप्राणी उपचार केंद्र) सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी इमारत उभारणीसह अन्य सुविधांचे काम सुरू असून वर्षभरात हे सेंटर कार्यान्वित होणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
नगर जिल्ह्यात सध्या वन्यप्राणी अथवा बिबट्या यांना जेरबंद करून त्यांच्यावर गरज असल्यास उपचार करण्यासाठी केंद्र नाही. यामुळेच नगरच्या वन विभागाने राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर याठिकाणी वन्य प्राणी उपचार केंद्र स्थापन करण्यासाठी जागा निवडली. निवडण्यात आलेल्या या ठिकाणी क्षेत्राची उपलब्धता, पाण्याची मुबलकता यांचा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात आला आहे. नव्याने साकार होत असणार्या या वन्यप्राणी उपचार केंद्रामध्ये या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे. वाढती जनसंख्या, जमिनीचा वापर करण्याची बदललेली पद्धती, यामुळे वन्यप्राण्यांना वनक्षेत्र अपुरे पडत असून त्यांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याने अपघाताने ते जखमी होण्याचा धोका अधिक आहे. याशिवाय त्या प्राण्यांची पिले अनाथ अवस्थेत सापडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे वन विभागाने बारागाव नांदूरमध्ये वाईल्ड ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा वन अधिकारी धर्मराम साल विठ्ठल यांनी दिली.
मानवाचा वन्यप्राण्यांच्या हक्काच्या क्षेत्रात वाढलेला हस्तक्षेप सर्वांनाच विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे. वन्यप्राण्यांच्या उपचाराकरिता होत असलेल्या केंद्रामध्ये वन्यप्राण्यांच्या जीवाचे संरक्षण होणे हा मुख्य उद्देश आहे.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये सिंचनाच्या सोयींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने बागायती पिकांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. याशिवाय शेतीच्या जवळपास वस्ती असल्याने पाळीव प्राण्यांच्या स्वरुपात बिबट्यास सुलभ रीतीने भक्ष्य उपलब्ध होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढला असून त्याचे पर्यवसान मानवी- वन्यप्राणी संघर्ष वाढताना दिसत आहे. नगर जिल्ह्यात संगमनेर, राहुरी, पारनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या अधिक आहे.
वाढती बिबट्यांची संख्या पाहता त्यांचे निर्बीजीकरण करण्याचा विषय धोरणात्मक असून त्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.