नगर तालुक्यात रानडुकरांनी उच्छाद मांडला असून, सर्वच पिकांची नासाडी करण्यात येत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. नासाडी झालेल्या पिकांचा पंचनामा करून तत्काळ मदत मिळण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
तालुक्यातील वनक्षेत्रातील वन्य प्राण्यांमध्ये सर्वाधिक रानडुकरांची संख्या असल्याचे वन विभागाच्या पाहणीतून समोर आले आहे. रानडुकरांची वाढती संख्या ही शेतकर्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. सद्यस्थितीत असलेल्या ज्वारी, मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान रानडुकरांकडून करण्यात येत आहे. रब्बी ज्वारीचे क्षेत्र ऐन बहरात असतानाच रानडुकरांकडून नुकसान होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आली आहे.
सुमारे एक एकर ज्वारीची पेरणी केली होती. ज्वारी हुरडयात आली असताना रानडुकरांनी मोठे नुकसान केले. ज्वारी संपूर्णतः पाडण्यात आली. नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून मदत मिळण्याची गरज आहे.अंबादास पवार, माजी सरपंच, जेऊर
रब्बी हंगामात तालुक्यात सुमारे 16 हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी करण्यात आली होती. दोन हजार हेक्टर क्षेत्रावर मका व इतर चारा पिकांची पेरणी करण्यात आली. खराब हवामानाचा परिणाम सर्वच पिकांवर दिसून आला. पिकांना विविध रोगांनी ग्रासले असताना महागड्या औषधांची फवारणी करून शेतकर्यांनी पिके जगविण्याचा प्रयत्न केला. अशातच रानडुकरांकडून पिकांची नासाडी होत असल्याने शेतकर्यांसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे.
जेऊर पट्ट्यातील ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात रानडुकरांकडून नुकसान सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. जेऊर, चापेवाडी, इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी, धनगरवाडी पट्ट्यातील ज्वारीचे व मका पिकाचे मोठ्या प्रमाणात रानडुकरांनी नुकसान केले.
या भागात रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने जेऊरच्या ग्रामसभेत रानडुकरांचा बंदोबस्त करण्याबाबतचा ठराव घेण्यात आला. रानडुकरांकडून झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकर्याला तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी माजी सरपंच अंबादास पवार यांनी केली आहे.