नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर परिसरात रानडुकरांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. पावसाअभावी अगोदरच खरीप पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. परिसरातील कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान करण्यात येत आहे. परिसरातील नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी प्रगतशील शेतकरी राजू पवार यांनी केली आहे.
नगर तालुक्यातील दक्षिण पट्ट्यात मान्सूनपूर्व पावसाने मोठा धुमाकूळ घातला होता. मेमध्येच दक्षिण पट्ट्यातील बहुतांशी तलाव, बंधारे, नाले तुडुंब भरले आहेत. मान्सूनपूर्व पावसाने जेऊर पट्ट्यात हुलकावणी दिली. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या थोड्याफार पावसावर शेतकर्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकून घेतल्या. परंतु त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. (Latest Ahilyanagar News)
खरीप पिके पावसाअभावी कोमेजून जाऊ लागली आहेत. त्यातच रानडुकरांकडून पिकांच्या नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जेऊर पट्टा कांदा लागवडीसाठी राज्यात प्रसिद्ध आहे.
त्यामुळे जून महिन्यात झालेल्या थोड्याफार पावसावर अनेक शेतकर्यांनी कांद्याची रोपे टाकली आहेत. परंतु रानडुकरांकडून कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान करण्यात येत आहे. अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांसमोर रानडुकरांमुळे दुहेरी संकट उभे ठाकले आहे.
जेऊर पट्ट्यातील ससेवाडी, बहिरवाडी, चापेवाडी, इमामपूर, धनगरवाडी ही गावे कांदा उत्पादनात अग्रेसर असतात. परंतु जून महिना संपला तरी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे खरीप पिकांचे भविष्य धोक्यात आले आहे.
कांद्याच्या रोपांचे रानडुकरांकडून मोठे नुकसान करण्यात येत आहे. पावसाअभावी कोमेजलेल्या खरीप पिकांचे, तसेच रानडुकरांकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी प्रगतशील शेतकरी राजू पवार यांच्यासह शेतकर्यांनी केली आहे.
शेतकर्यांकडून देशी जुगाड!
रानडुकरांचा उपद्रवापासून पिके वाचविण्यासाठी शेतकर्यांकडून शेतीच्या चोहोबाजूंनी लाल रंगाच्या कांद्याच्या गोण्या लावण्यात येतात. त्यामुळे रानडुकरांना सदर ठिकाणी मनुष्य असल्याचे भासते. पर्यायाने रानडुकरे येत नसल्याचा अनुभव शेतकरी सांगतात. शेतकर्यांकडून करण्यात येणार्या देशी जुगाडाची चांगलीच चर्चा होत आहे.
जेऊर पट्ट्यातील खरीप पिके धोक्यात !
जेऊर परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या ओलीवर शेतकर्यांनी मूग, सोयाबीन, उडीद, बाजरी पिकांची पेरणी केली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिके कोमजण्यास सुरुवात झाली. पावसाअभावी परिसरातील खरीप पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
चापेवाडी परिसरात 16 पायली कांद्याचे रोप टाकण्यात आले आहे. सरासरी साडेसहा हजार ते सात हजार रुपये पायली दराने कांदा बियाणे खरेदी करण्यात आले. शेतीची मशागत व कांद्याचे बियाणे यासाठी सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च झाला. रानडुकरांकडून कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. पंचनामे करून मदत मिळावी.-राजू पवार, प्रगतशील शेतकरी