Water Tanker Pudhari
अहिल्यानगर

Water Shortage: संगमनेरात चार टँकरने पाणीपुरवठा; 9 गावे, 10 वाड्यांसाठी टँकर सुरू

पाणी टंचाई लक्षात घेता, प्रस्तावांना मंजुरी मिळताच, तालुक्यात टँकर सुरू करण्यात आले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

संगमनेरः तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी, पाणीटंचाई कायम आहे. सध्या 9 गावांसह 10 वाड्यांसाठी चार टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, उन्हाची तिव्रता वाढताच येत्या काही दिवसात टँकरची संख्या वाढवावी लागणार आहे.

मागील वर्षी पाऊस चांगला पडला. यामुळे यंदा टँकरची मागणी उशिरा करण्यात आली. एप्रिल महिन्यात पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. तालुक्यात पाणी टंचाई जाणू लागल्यामुळे ग्रामपंचायतींनी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीला सादर केले. पाणी टंचाई लक्षात घेता, प्रस्तावांना मंजुरी मिळताच, तालुक्यात टँकर सुरू करण्यात आले आहेत.

तालुक्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी, पाणीटंचाई मात्र जाणवतच आहे. पाणी टंचाई असलेल्या गावात अवकाळी पाऊस पडला नाही. विशेषतः पठार भागातील अनेक गावांना पाणी टंचाई जाणवत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाणी टंचाईची समस्या कायम आहे.

नागरिक टँकरच्या पाण्याने तहाण भागवत आहेत. येत्या काही दिवसात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही भेडसावणार आहे. सध्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. परिणामी शेतकऱ्यांना दुहेरी संकटांचा सामना करावा लागत आहे.

गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी तालुक्यात अवकाळी पावसाने अनेक भागात हजेरी लावली. पावसामुळे गहू, मका, कांदा, सोयाबीन पिकांसह डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले, मात्र दुष्काळी भागात पाण्याची समस्या कायम आहे.

12 हजार 527 नागरिकांना टँकरचा आधार

संगमनेर तालुक्यातील डोळसणे, पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी, चौधरवाडी, कुंभारवाडी, खरशिंदे, वरवंडी, कर्जुले पठार व गुंजाळवाडी पठार या 9 गावांसह गावांतर्गत 10 वाड्यांसाठी 4 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. 12 हजार 527 नागरिक या टँकर्सच्या पाण्याने तहाण भागवत आहेत. उन्हाची तीव्रता वाढताच ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यामुळे आता हळू-हळू टँकर्सची मागणी वाढणार आहे. विशेषतः मे महिन्यात अधिक टँकर्स सुरु करावे लागणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT