संदीप रोडे, अहिल्यानगर
अवघा महाराष्ट्र तीन दशकांपासून पवार आणि विखे कुटुंबातील राजकीय संघर्ष पाहतो आहे. नगरचे हेवीवेट भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनी पुन्हा एकदा ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून शरद पवार यांना घेरण्याचा ‘डाव’ टाकल्याचे समजते. ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’च्या चौकशीमागे मंत्री विखे यांचे ‘ते’ पत्र कारणीभूत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. शरद पवार यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांना घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे हळूहळू समोर आल्यास नवल वाटू नये.
1991 पासून विखे व पवार कुटुंबात टोकाची राजकीय कटुता आहे. सहकारमहर्षी स्व. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या विरोधात त्यावेळी शरद पवार यांनी यशवंतराव गडाख यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती आणि बाळासाहेब विखे यांचा पराभव केला होता. पण विखे यांनी चारित्र्यहननच्या मुद्द्यावर पवारांना कोर्टात खेचल्याचा इतिहास आहे. तेव्हापासून हा राजकीय संघर्ष आजही सुरूच आहे. काँग्रेस आघाडीत विरोधी पक्षनेते असतानाही 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी डॉ. सुजय विखे यांच्यासाठी नगरची जागा शरद पवारांकडून घेण्यात राधाकृष्ण विखे-पाटलांना यश मिळाले नव्हते. त्यामुळे सुजय विखे भाजपात गेले अन् नगरचे खासदारही झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असताना पाठोपाठ राधाकृष्ण विखे-पाटील भाजपवासी झाले.
2019 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी साकारली अन् सरकारही स्थापन झाले. पुढे शिवसेनेची दोन शकले झाली. त्यात विखेंचा ‘मोला’चा वाटा होता. मविआचे सरकार पायउतार होत, महायुतीचे सरकार आले. यात दोन नंबरच्या शपथेसोबत विखेंना महसूल खात्याची ‘बक्षिसी’ मिळाली. काळाच्या ओघात राष्ट्रवादीतही फूट पडली. अजित पवार महायुतीत सामील झाले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीला महायुती एकत्रितपणे सामोरे गेली. सरकार आले, पण या सरकारमध्ये विखेंना जलसंपदा खाते मिळाले, तेही अर्धेच. मात्र, विखेंनी त्यातही समाधान मानत ‘कार्यक्रम’ सुरूच ठेवला. ‘ठरवले तर काहीही करू शकतो’ अशी विखेंची ख्याती. त्यांना स्वत:लाही त्यावर आत्मविश्वास आहे, यात शंका नाही. कोणी कितीही ‘राम’बाण उपाय शोधत ‘कोल्हे’कुई केली तरी सर्वांना सोबत घेत भाजपची कमान ते उंचावत आहेत. आता ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’चे अस्त्र हाती लागल्याच्या चर्चेच्या अग्रस्थानी आहेत ते मंत्री विखे-पाटील. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी मंत्री विखेंची ‘हॉट लाईन’ जुळलेली आहे.
मोदी सरकारच्या तिसर्या पर्वात केंद्रात पहिल्यांदाच सहकार खाते स्थापन झाले अन् त्याचे मंत्रिपद अमित शहा यांच्याकडे आले. देशातील राजकीय घटक पक्षांना एकत्र करत शरद पवारांनी ‘इंडिया आघाडी’चा प्रयोग केला, पण तोही फसला. शरद पवारांना घेरण्याचा प्रयत्न तेव्हापासून सुरू होता, मात्र ‘सूर’ गवसत नव्हता. सहकारात माहीर असलेल्या राधाकृष्ण विखे यांनी ‘तो सूर’ शोधून काढल्याची चर्चा जोर धरू पाहत आहे. शरद पवारांचे वर्चस्व असलेल्या ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’च्या कारभारावर आक्षेप घेत चौकशीची मागणी करणारे पत्र मंत्री विखे यांनी दिल्याची चर्चा आहे. राज्य सरकारने पत्राची गंभीरपणे दाखल घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’च्या चौकशीचा निर्णय घेतला. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने 2009 ते 2025 या 17 वर्षातील आर्थिक व्यवहाराची इत्थंभूत माहिती मागविली आहे. ही समिती ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’चे बॅलेन्सशीट, ऑडिट रिपोर्ट तसेच राज्य सरकारकडून मिळालेल्या अनुदानाचा विनीयोगाची तपासणी करणार आहे. त्यात अनियमितता आढळल्यास ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ पर्यायाने शरद पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. डॉ. कोलते यांची समितीला अहवाल देण्यासाठी सरकारने 60 दिवसांची मुदत दिली आहे.
‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ च्या चौकशीच्या माध्यमातून शरद पवारांना घेरण्याची संधी भाजपला या निमित्ताने मिळाली, पण त्याचे कारण ठरले ते विखे-पाटील यांचे चर्चेतील पत्र. चौकशीच्या माध्यमातून शरद पवारांची दुखरी नस मंत्री विखे-पाटील यांनी पकडण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या 2024 मधील लोकसभेच्या पराभवाची परतफेड करण्यासोबच त्यांचे पुनर्वसन करण्याची संधीही मंत्री विखे-पाटील यांना लाभेल, हे भविष्य सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज न लागे.
पुणे महापालिकेचीही किनार!
आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी (शरद पवार-अजित पवार) एकत्रित येण्याच्या हालचाली सुरू आहेत. महायुतीचा घटकक्ष असलेल्या अजित पवारांमागे ‘अमेडिया’चा भुंगा लागलेला आहेच, आता ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’च्या चौकशीचा ससेमिरा लागल्याने थोरले पवारही चर्चेत आले आहेत. थोरले अन् धाकटे पवार दोघांनाही घेरण्याचा डाव टाकत ‘पॉवर लूज’ करताना भाजपने पुणे महापालिकेत ‘कमळ’ फुलवले तर त्याचेही श्रेय आपसूकच मंत्री विखे-पाटील यांना ‘त्या’ चर्चेतील पत्रामुळे मिळाल्यास आश्चर्य वाटू नये. अहिल्यानगर जिल्ह्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संस्थान विखे-पाटील यांनी खालसा केल्यातच जमा आहे. आता ते राज्याच्या दिशेने निघाले आहेत. मंत्री विखे -पाटील यांची ‘त्या’ चर्चेतील पत्राच्या माध्यमातून सरशी होणार की राजकीय आखाड्यात कसलेले पैलवान शरद पवार ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ च्या चौकशीतून सहीसलामत निसटणार, यासाठी काही काळ मात्र प्रतीक्षा करावी लागेल.