जामखेड: अरणगाव येथे नियोजित असलेला बालविवाह उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्प, जामखेड पोलिस आणि ग्रामविकास अधिकार्यांनी वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे यशस्वीरित्या थांबवण्यात आला. या घटनेमुळे एका अल्पवयीन मुलीचे भविष्य सुरक्षित झाले असून, तिला कायद्याचे संरक्षण आणि पुढील शिक्षणाला बळ मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अरणगावातील एका कुटुंबाने त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह निश्चित केला होता. या संभाव्य बालविवाहाची माहिती उडान हेल्पलाईनवर आलेल्या एका गोपनीय दूरध्वनीद्वारे समन्वयक प्रवीण कदम, योगेश अब्दुले यांना मिळाली. (Latest Ahilyanagar News)
माहिती मिळताच अब्दुले यांनी हा बालविवाह थांबविण्यासाठी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, ग्रामविकास अधिकारी विनोद खुरुंगळे यांच्याशी संपर्क साधून माहितीची पडताळणी करत खात्री केली. त्यानंतर अब्दुले, सहायक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी कदम, पोलिस कॉन्स्टेबल सचिन देवडे, ग्रामविकास अधिकारी विनोद खुरुंगळे यांनी मुलीच्या पालकांशी थेट संवाद साधून त्यांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदींची माहिती दिली.
या कायद्यानुसार मुलीसाठी विवाहाचे कायदेशीर वय 18 आणि मुलासाठी 21 असणे बंधनकारक आहे. हे कार्यकर्त्यांनी पालकांना समजावून सांगितले. बालविवाह घडवून आणल्यास दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतो. त्यामुळे हा विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले.
‘उडान’च्या कार्यकर्त्यांनी पालकांना केवळ कायद्याची माहितीच दिली नाही, तर बालविवाहाचे मुलीच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर होणारे गंभीर दुष्परिणामही समजावून सांगितले. अल्पवयीन वयात होणार्या गर्भधारणा आणि प्रसूतीमुळे शारीरिक गुंतागुंत, कुपोषण आणि बालमृत्यू, मातामृत्यू, विविध गंभीर आजारांचा धोका वाढतो हे त्यांनी स्पष्ट करत समुपदेशन केले. त्यामुळे हा बालविवाह रोखण्यासाठी अधिकार्यांच्या भूमिका आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्य मिळाले आहे.
उडान : बालविवाहमुक्त भारताची प्रेरणा
‘उडान’ प्रकल्प केवळ बालविवाह रोखण्यापुरते मर्यादित नाही; ते जनजागृती, शिक्षण, पुनर्वसन, आरोग्य आणि स्वावलंबनावर कार्य करते. बालविवाह थांबल्यानंतर ’उडान’ प्रकल्प मुलीचे शिक्षण पुढे चालू राहण्यासाठी तिला पुन्हा शाळेत दाखल करून सक्षम आणि स्वावलंबी भविष्यासाठी प्रयत्नशील असेल. स्नेहालय ‘उडान’ प्रकल्पाचे हे कार्य बालविवाहमुक्त भारताची प्रेरणा बनत आहे. यामुळे अनेक मुलींचे आयुष्य सुरक्षित बनत आहेत.