श्रीगोंदा:
तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे गुरुवारी (दि.२३) सकाळी नऊ वाजता आनंदी अनिल कांडेकर (वय ४) आणि वीरा प्रवीण कांडेकर (वय३) या दोन चिमुकल्या शेततळ्यात पडल्या. मात्र, उपचारासाठी दौंड येथे जाण्यासाठी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला. संतप्त झालेल्या ग्रामस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्रास कुलूप लावत आरोग्य अधिकारी मुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचे निलंबन करण्यासाठी दारातच आंदोलन सुरू केले.
जवळपास चार तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान आलेल्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे व तालुका आरोग्य शैला डांगे यांनाही आंदलोनकर्त्यांनी आरोग्य केंद्रात डांबून ठेवले होते.
पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी मध्यस्थी करीत संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या बाबत अधिक माहिती अशी की, कांडेकर या शेतकरी कुटुंबातील आनंदी अनिल कांडेकर आणि वीरा प्रवीण कांडेकर या दोन लहान मुली खेळता खेळता शेतात असलेल्या शेततळ्यात पडल्या. ही बाब लक्षात येताच स्थानिक लोकांनी तात्काळ धाव घेऊन दोन्ही मुलींना पाण्यातून बाहेर काढले.
मुलींचा जीव वाचवण्यासाठी उपस्थितांनी तातडीने स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून रुग्णवाहिका पाठवण्याची विनंती केली. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी प्रशांत मुळे यांनी रुग्णवाहिका पाठवण्यास असमर्थता दर्शवली. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे दोन्ही चिमुकल्यांवर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. परिणामी त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला.
लोणी व्यंकनाथ येथील गावकरी आक्रमक झाले. जोपर्यंत दोषी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुळे यांच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत लोणी व्यंकनाथ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उघडू दिले जाणार नाही, असा ठाम पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, स्मितल वाबळे, जहीर जकाते, शिवा ताडे,गणेश काकडे, बाळासाहेब थोरात, बंडू काकडे, राहुल गोरखे, ज्ञानदेव मगर, चंद्रकला पवार, राजेंद्र काकडे उपस्थित होते.
आरोग्यमंत्र्यांनी घेतली दखल
प्रस्तुत प्रतिनिधीने राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क साधून लोणी व्यंकनाथ येथील आरोग्य केंद्राने रुग्णवाहिका न दिल्याने दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. आरोग्यमंत्र्यांनी याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
लोणी व्यंकनाथ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेली रुग्णवाहिका न दिल्याच्या कारणातून आज जे काही आंदोलन झाले, त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करणार आहोत. जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल.-ज्योती मांडगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
रुग्णवाहिका न दिल्याने दोन लहान मुलींचा मृत्यू झाला ही वेदनादायक घटना आहे. यातील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करणार आहे.- टिळक भोस, सामाजिक कार्यकर्ते