मदतीचा ओघ  pudhari
अहिल्यानगर

अजून जिवंत आहे माणुसकी ! कुणी घर बांधून देणार, तर कुणी मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेणार

मुलांचे शिक्षण व तिला नोकरी मिळवून देण्याचाही शब्द

पुढारी वृत्तसेवा

नगर : होय. माणुसकी अजून जिवंत आहे. भंगार गोळा करायला जाताना मुलांना साखळीने बांधून ठेवणार्‍या मातेला भलेही शिर्डीतून हाकलून दिले असेल, पण ‘पुढारी’ने तिच्या व्यथा-वेदनांचा पदर उलगडल्यानंतर तिच्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. कुणी तिला घर बांधून देण्याची तयारी दर्शविली, तर कुणी तिच्या मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याची तयारी केली. कुणी तिला किराणा सामान घेऊन आले, तर कुणी रोख रक्कम द्यायाला गेले. तिची ‘मास्टर ऑफ सोशल वर्क’ ही पदवी भलेही भंगारात जमा होऊ पाहत होती, पण भंगाराला सोन्याची झळाळी देण्यासाठी समाज उभा राहतो, याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले...

‘मास्टर ऑफ सोशल वर्क भंगारात’ हे वृत्त प्रसिद्ध करून (गुरुवार, दि. 20 मार्च 2025) ‘पुढारी’ने संतोषीच्या व्यथा समाजासमोर मांडल्या. एका मातेची झालेली ही ससेहोलपट उघड्या डोळ्यांनी पाहील, तो समाज कुठला... या व्यथा वाचून संतोषीच्या मदतीसाठी गुरुवारी जणू स्पर्धा लागली. सकाळपासूनच संतोषीच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येऊ लागले. अनेकांनी ‘पुढारी’ प्रतिनिधीच्या माध्यमातून संतोषीशी संपर्क साधला. ब्राह्मणी येथील बाळासाहेब हापसे यांनी तिच्या घरावर पत्रे टाकून देण्याची तयारी दर्शवली. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक सुनील आडसुरे, उंबरे सोसायटीचे माजी अध्यक्ष विलासराव ढोकणे, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढोकणे, शिवसेनेचे दीपक पंडित, भास्कर दरंदले, पत्रकार लक्ष्मण पटारे, प्रवीण गायकवाड आदींनी संतोषीची भेट घेऊन मदतीचे हात पुढे केले. गावातील छत्रपती प्रतिष्ठानने ‘पुढारी’च्या माध्यमातून मदतकार्यासाठी पुढाकार घेतला आहे.

नगर येथील बांधकाम व्यावसायिक किरण काळे यांनी संतोषीचे घर बांधून देणार असल्याचे ‘पुढारी’ कार्यालयात फोन करून सांगितले. शिवाय आणखी सर्व प्रकारची मदत करू, अशी ग्वाहीही दिली. शिर्डीच्या साई शिवालय प्रतिष्ठानतर्फे शिवसेनेचे जिल्हा नेते कमलाकर कोते यांनी तातडीने पाच हजारांची रोख रक्कम संतोषीपर्यंत पोहचवली. शिवसेनेचे (नगर) दिलीप सातपुते यांनी ‘हवी ती मदत’ करणार असल्याचे जाहीर केले. जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचार्‍यांनीही फोन करून सकारात्मक प्रतिसाद पाठवला. राहुरीच्या युगंधरा ग्रुपनेही महिला दिनाच्या उंबरे येथील रविवारच्या कार्यक्रमात किराणा साहित्य व इतर साहित्य देणार असल्याचे कळवले. शिर्डीचे सामाजिक कार्यकर्ते अमोल कोते, किशोर पाटणी, सेवानिवृत्त अधिकारी सुरेश कदम, सामाजिक कार्यकर्ते गौरव तनपुरे यांनी, तसेच साईराम हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालयाच्या पथकानेही उंबरे येथे जेऊन ही संतोषीशी संपर्क साधला आणि आपापल्या परीने मदत करणार असल्याचे सांगितले.

अहिल्यानगरहून स्नेहालय संचलित स्नेह मनोयात्री पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक रमाकांत दोदे, परिचारिका सोनाली साळवे, सोशल वर्कर सोनू शहा, वाहनचालक गणेश धारेकर आदी उंबरे येथे गेले. त्यांनी संतोषीची, तिच्या मुलांची आणि घराची अवस्था पाहून दुःख व्यक्त केले. संतोषीला स्नेहालयात आधार देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मुलांचे शिक्षण व तिला नोकरी मिळवून देण्याचाही शब्द त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT