रस्ता कामाचा श्रीगणेशा Pudhari
अहिल्यानगर

आमदारांची तंबी अन् रस्ता कामाचा श्रीगणेशा

या रस्त्याचे रूंदीकरण करणार्‍या ठेकेदाराला आदेश देत, मंगळवारी या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर शहर : ‘संगमनेरातील प्रवरा नदी पूल ते बसस्थानकापर्यंतची अतिक्रमणे हटविताच पुन्हा अतिक्रमण जैसे- थे!’ या मथळ्याचे वृत्त दैनिक पुढारीतून प्रसिद्ध होताच आमदार अमोल खताळ यांनी गांभीर्याने दखल घेतली. या रस्त्याचे रूंदीकरण करणार्‍या ठेकेदाराला आदेश देत, मंगळवारी या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार खताळ यांनी दिली. दरम्यान, या गैरसोईकडे अचूक लक्ष वेधल्याने संगमनेरकरांनी ‘पुढारी’च्या वृत्ताचे कौतुक केले आहे.

संगमनेर शहरातून जाणार्‍या नाशिक- पुणे महा मार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. बस स्थानक ते प्रवरा नदी मार्गावर नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम व पोलिस या तिन्ही विभागांनी एकत्र येवून ही अतिक्रमण हटावो मोहीम यशस्वी राबवली. शहरातील वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी पहिल्या टप्प्यात अमृतवाहीनी इंजिनिअरिंग ते बस स्थानक तर दुसर्‍या टप्प्यात रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द हा रस्ता रुंदीकरण करण्याचे काम पूर्ण झाले, मात्र बस स्थानक ते प्रवरा नदी मार्गावरील अतिक्रमणामुळे काम थांबले होते.

पुणे- नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष निधीतून मंजूर झाले होते. बस स्थानक ते प्रवरा नदी पुलापर्यंत व तीनबत्ती चौक ते ज्ञानमाता विद्यालयापर्यंतची दुतर्फा अतिक्रमणे वाहतुकीला व रस्ता रुंदीकरण कामात अडथळा ठरत होती. याबाबत आमदार अमोल खताळ यांच्याकडे तक्रार आली होती. या पार्श्वभूमीवर पालिका, सार्वजनिक बांधकाम व पोलिसांनी एकत्र कारवाई करुन, अनाधिकृत अतिक्रमणे हटविली, मात्र अवघा 10 दिवसांचा कालावधी उलटताच पुन्हा अतिक्रमण जैसे-थे झाले होते. यामुळे अतिक्रमण हटावो मोहीम जणू फार्स ठरली. या मोहीमेचा फज्जा उडाल्याने कारवाईचा काय उपयोग झाला, असा सवाल नागरिक करतात. अशा आशयाचे वृत्त (दि. 7 फेब्रुवारी) रोजी ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल घेत, आमदार अमोल खताळ यांनी, खुलासा केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT