तनपुरे कारखान्याची निवडणूक Pudhari
अहिल्यानगर

Tanpure Factory Election: ‘तनपुरे’च्या सभासदांचं ‘चुन चुन के मतदान’?, क्रॉस वोटिंग वाढणार

या निवडणुकीत मोठी क्रॉस व्होटींग होणार याचे आतापासूनच संकेत मिळत आहेत

पुढारी वृत्तसेवा

रियाज देशमुख

राहुरी : राहुरी तालुक्याची अस्मिता असलेल्या तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत उतरलेल्या तीन पॅनलच्या माध्यमातून 56 उमेदवार आपले नशिब अजमावत आहे. राहुरीकर नेहमीच निवडणूक कोणतीही असो, त्यात सोयर्‍या धायर्‍यांचे नातेगोते खुबीने जोपासत असतात. त्यात सहकारातील निवडणूक म्हटल्यावर क्रॉस ओटींगव्दारे ‘चुन चुन के’ मतदान करण्यात सभासद पटाईत आहेत. तर उमेदवारांनीही गावातील सभासद यादी पडताळताना सोयर्‍या धायर्‍यांच्या भेटीगाठी सुरू केल्याचे दिसते आहे. यातून या निवडणुकीत मोठी क्रॉस व्होटींग होणार याचे आतापासूनच संकेत मिळत आहेत.

राहुरीची कामधेनू अडचणीत सापडली आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाढत गेल्याने संलग्न संस्थांवर ‘अवकळा’ आली. अभियंता महाविद्यालयाला टाळे लागत असताना आयुर्वेद महाविद्यालय, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळालाही अडचणी निर्माण होऊ लागल्या. जमिन विक्री करूनही कर्ज कमी होण्याऐवजी वाढले. मागिल सत्ताधार्‍यांनी तनपुरे कारखान्याला बंद अवस्थेत सोडून दिले. साहित्य भंगारात विक्री झाले. गौण खनिज उत्खननाचा फटकाही तनपुरे कारखान्याला बसला. सभासद, कामगारांची देणी थकली. शासकीय कर, दंड तसेच इतर देणीमुळे अडचणीत आलेल्या कारखान्याला अंधारातून प्रकाशमानाकडे नेणारा दिवा सभासद शोधणार आहेत. प्रचारात सर्वच पॅनल प्रमुख आणि उमेदवार हे सभासद आणि कामगारांना ‘शब्द’ देत आहेत.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या गटाने निवडणुकीतून माघार घेतली असली तरीही शेटे यांच्या शेतकरी विकास मंडळाच्या बॅनरमुळे आपसुकच भाजपची ताकद शेटे यांनाच राहिल, अशीही सुप्त चर्चा आहे. परंतु, दुसरीकडे जनसेवा मंडळाचे नेते अरुण तनपुरे यांनी राहुरी परिसरातील ‘सोधा’ पॅटर्न लक्षात घेता काही उमेदवार्‍या दिल्या आहेत. त्यामुळे साहजिकच काही शक्ती अंधारात त्यांच्या पॅनलचे काम करतील, अशाही चर्चा आहेत.

तनपुरे कारखाना सभासदाची मालकी रहावी व निवडणुकीसाठी न्यायालयीन लढा देणार्‍या कारखाना बचाव कृती समितीचा लंगडा पॅनल झाला आहे.

कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ, अरुण कडू, अजित कदम, आप्पासाहेब ढुस यांचे शिष्टमंडळ कारखान्याला वाचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत असल्याची साद सभासदांना घालत आहे. तर राजू शेटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादाने कारखाना सुरूच करणार असे आश्वासन दिले आहे. जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्तीवर तनपुरे कारखान्याचे धुराडे पेटविण्याचा श्रीगणेशा करणारच असा विश्वास दिला आहे. तिन्ही प्रमुख पॅनलचे नेते कारखाना सुरू करणारच, असा चंग बांधून निवडणुकीत उतरले आहे.

भाजपच्या नेत्यांची नेमकी मदत कोणाला?

भाजपचे आ. कर्डिले यांनी विजयी झालेल्या पॅनलला निवडणुकीनंतर मदत करू असा उघड शब्द दिला. परंतु भाजपचे नेते व कार्यकर्ते मात्र आतून कोणत्या पॅनलला मदत करणार? अशी सुप्त चर्चा आहे. तनपुरे कारखान्यामध्ये सत्ता मिळाली तरी आगामी काळात कारखाना सुरू करणे आव्हानात्मक आहे. सत्ताधार्‍यांची मदत तनपुरे कारखान्याला गरजेची आहे. त्यामुळे निवडणुकीत व निवडणुकीनंतर भाजप कोणाला पाठबळ देणार? याविषयीची उत्कंठा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT