मेंढपाळांचे विदारक चित्र Pudhari
अहिल्यानगर

धरणी हीच माय आणि आभाळ हाच बाप... ; मेंढपाळांचे विदारक चित्र

बालपणही हरवले; शिक्षणाची वाताहत; चिमुकल्यांचे भविष्यही अंधःकारमय

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत पवार

संपूर्ण आयुष्य रानावनात भटकंती करत मेंढपाळीच्या व्यवसायातून आपली उपजीविका भागवणार्‍या मेंढपाळांच्या आयुष्याचे विदारक चित्र ठिकठिकाणी पाहावयास मिळते. चिमुकल्यांचे बालपणही हरवून बसले आहे. शिक्षणाची वाताहत झाली असून, त्यांचे भविष्यही अंधःकारमय बनले आहे. ‘धरणी हीच माय.. अन् आभाळ हाच बाप...’ अशाच परिस्थितीत संपूर्ण आयुष्य भटकंतीत व्यतीत करणार्‍या मेंढपाळांच्या जीवनातील कटू सत्य आहे. जीवन जगताना सहन करावा लागणार्‍या हाल अपेष्टा जाणून घेताना अंगावर अक्षरशः शहारे येतात.

बालपणी ज्या वयात हातात पाटी आणि पेन्सिल घेऊन धडे गिरवायचे असतात त्याच वयात हातात काठी घेऊन मेंढरं वळण्याची वेळ मेंढपाळांच्या चिमुकल्यांवर येत आहे. वर्षभर गावोगावी भटकंती करणार्‍या मेंढपाळांच्या मुलांच्या शिक्षणाचीही वाताहत झाली आहे. लोकर, मास, दूध यातून मिळणार्‍या उत्पादनातून मेंढपाळांची उपजीविका चालू असते. मेंढपाळांच्या मेंढ्यांना चरण्यासाठी चराऊ जागा शिल्लक नसल्याने संपूर्ण आयुष्य रानोमाळ भटकंतीतच जाते.

संपूर्ण आयुष्य रानोमाळ भटकंती करता करता मेंढपाळांना निसर्गाशी मोठा लगावदेखील झाला आहे. निसर्गाशी त्यांचे अनोखे नाते जोडले गेले आहे. ऊन, वारा, पाऊस सर्वकाही सहन करत बाराही महिने गावोगावी भटकंती करत मेंढपाळ आपल्या कुटुंबासह राहत असतात. रानावनात डोंगराच्या दर्‍या-खोर्‍यांमध्ये पालं ठोकून राहणार्‍या मेंढपाळांच्या कुटुंबाला, तसेच त्यांच्या चिमुकल्यांच्या जीवाला वन्यप्राण्यांपासून मोठा धोकाही असतो. परंतु नाईलाज म्हणून त्यांना राहावेच लागते.

ऋतुनुसार त्यांच्या भटकंतीच्या मार्गामध्ये बदल होत असतो. शेकडो किलोमीटरचा प्रवास करत चार्‍याच्या शोधासाठी मेंढपाळांची भटकंती सुरूच असते. मेंढपाळांची स्वतःची खास परंपरा, लोककला, गाणी नृत्य प्रकार असतात. त्यांची वेशभूषा, देव-देवतांवरील श्रद्धा आणि जीवनशैली यातून त्यांची अनोखी संस्कृती दिसून येते.

मेंढपाळांच्या भटकंतीमुळे पर्यावरणाचा समतोल साधला जातो. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालनादेखील मिळते. परंतु त्यांची संपूर्ण हयात ही रानोमाळ भटकंतीतच जात असून, भटकंतीदरम्यान सहन कराव्या लागणार्‍य हाल अपेष्टा आजही लक्ष वेधून घेतात.

विदारक चित्र...

सह्याद्रीच्या डोंगररांगा, विदर्भातील पठारे, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सपाट प्रदेश ही मेंढपाळांच्या भटकंतीची मुख्य क्षेत्र आहेत. नगर तालुक्यातही मेंढपाळ मोठ्या प्रमाणात भटकंती करत वास्तव्यास येत असतात. त्यांच्यासोबत चिमुकलेही भटकंती करत असल्याने त्यांच्यातील बालपणच हरवल्याचे विदारक चित्र दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT