कर्जत: कर्जत नगरपंचायतीमधील सत्तांतराची प्रक्रिया सोमवारी अखेर पूर्ण झाली. आमदार रोहित पवार यांच्या ताब्यातील नगरपंचायत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी खेचून घेतली. संतोष मेहत्रे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जतच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक सोमवारी (दि. 19) झाली. सकाळी 11 ते दुपारी एकपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. बंडखोर गटाकडून गटनेते संतोष मेहत्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला. रोहित पवार यांच्या गटाकडून कोणाचाही अर्ज आला नाही. दुपारी दोन वाजता पीठासन अधिकारी नितीन पाटील यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी संतोष मेहत्रे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, सतीश पाटील, छाया शेलार, माया दळवी, ताराबाई कुलथे, ज्योती शेळके, लंकाबाई खरात, मोहिनी पिसाळ, सुवर्णा सुपेकर, मोनाली तोटे हे सभागृहामध्ये उपस्थित होते.
राम शिंदे मिरवणुकीसाठी कर्जतला
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठका होत्या. त्या संपल्यानंतर शिंदे खासगी विमानाने बारामतीला आणि तेथून मोटारीने कर्जतला पोहोचले. नगराध्यक्ष रोहिणी घुले व उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांचा त्यांनी सत्कार केला. त्यानंतर दोघांची मिरवणूक काढण्यात आली. ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरामध्ये जाऊन सर्वांनी दर्शन घेतले.
रोहित पवारांनी आत्मचिंतन करावे : राम शिंदे
पत्रकारांशी बोलताना राम शिंदे म्हणाले, की वास्तविक पाहता या नगरसेवकांचा ताळमेळ घालण्यात, त्यांच्यात संवाद ठेवण्यात आणि त्यांना एकत्र ठेवण्यात रोहित पवार अपयशी ठरले. नगरसेवकांनी उठाव केला. लोकशाहीमध्ये बहुमत असूनही अविश्वासाची तरतूद नव्हती म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील मंत्रिमंडळाने नवीन अध्यादेश जारी केला आणि त्यानुसार अविश्वास दाखल करण्यात आला. कर्जत नगरपंचायतीत सत्ता परिवर्तन झाले. दुसर्यांवर टीका करण्यापेक्षा आपल्याला अनेक लोक सोडून जात आहेत, यावर रोहित पवार यांनी आत्मचिंतन करावे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक अजूनही त्यांच्याच निवडून आलेल्या पक्षात आहेत, असेही शिंदे म्हणाले.