दीपक ओहळ
विधानसभेत दमदार कामगिरी करणार्या अनेकांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मंत्री असताना राज्यभर कामाची छाप पाडणारे बी. जे. खताळ, गोविंदराव आदिक, शंकरराव काळे, आबासाहेब निंबाळकर, बबनराव ढाकणे आदींसह जिल्ह्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनाही मतदारांनी कधीतरी नाकारल्याचे निवडणुकांच्या इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते.
स्वातंत्र्यानंतर जिल्ह्यातील अनेकांनी सहकारी साखर कारखानदारी उभारली. या कारखान्यांच्या तसेच विधानसभेच्या माध्यमातून नेतेमंडळींनी तालका तालुक्यांत सामाजिक, शैक्षणिक तसेच औद्योगिक विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. सातत्याने विधानसभेत निवडून गेलेल्यांना मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्यपातळीवर भरीव कामगिरी करण्याची संधी मिळालेली आहे. मात्र, अशा परिस्थितीत बहुतांश ज्येष्ठ नेत्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
विधानसभेची पहिली निवडणूक 1962 मध्ये झाली. संगमनेरमधून बी.जे. खताळ सलग तीन वेळा विजयी झाले होते. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते पाटबंधारे मंत्री होते. त्यांनी राज्यातील अनेक लहान मोठी धरणे बांधली. मंत्रिपदाची उत्तम कामगिरी करणार्या खताळ पाटलांचा पराभव काँग्रेसचे भाऊसाहेब थोरात यांनी 1978 मध्ये केला होता. त्यानंतर मात्र खताळ पाटील 1980 मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झाले होते.
शंकरराव काळे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष. ते 1972 व 78 मध्ये दोन वेळा पारनेरमधून विधानसभेवर निवडून गेले. पुलोद सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते. सहकार क्षेत्रात उत्तम कामगिरी तसेच सहकार क्षेत्रात दबदबा असताना त्यांना 1980 मध्ये शंकरराव कोल्हे यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 1978 मध्ये पुलोद सरकार स्थापन करण्यात गोविंदराव आदिक यांचा पुढाकार होता. आदिक पुलोद सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री होते. जिल्हाभर आणि राज्यभर दबदबा असणार्या गोविंदराव आदिक यांना 1980 व 1990 मध्ये भानुदास मुरकुटे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
सहकार क्षेत्रातील मातब्बर आणि 1962, 67 मध्ये शेवगाव मतदारसंघातून विधानसभेत पोहोचले मारुतराव घुले पाटील यांचा 1990 मध्ये शेवगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवार तुकाराम गडाख यांनी पराभव केला. कर्जतचे रहिवासी आणि माजी ग्रामविकास राज्यमंत्री आबासाहेब निंबाळकर यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले.
अहमदनगर कॉलेजचे प्राध्यापक एस.एम.आय. असीर अचानक राजकीय पटलावर चमकले. 1980 मध्ये काँग्रेसचे उमेदवारी मिळून ते नगर शहराचे आमदार झाले. आमदार होताच थेट राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील केले होते. राजकीय क्षेत्रात नावाजले जात असतानाच 1985 मध्ये त्यांचा दादा कळमकर यांनी पराभव केला.
श्रीगोंदा मतदारसंघातून सात वेळा बबनराव पाचपुते विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात गृह राज्यमंत्री, तसेच वन व आदिवासी विकासमंत्री म्हणून काम पाहिलेले पाचपुते 1999 व 2014 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. पाथर्डीचे तीनदा प्रतिनिधित्व करणारे बबनराव ढाकणे पुलोद सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यानंतर 1993 मध्ये शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात देखील कॅबिनेट मंत्री होते. त्यांचा मात्र 1999 मध्ये दगडू बडे यांनी पराभव केला होता.
नगर-नेवासा व राहुरी या दोन मतदारसंघातून विजयी झालेले आणि काही काळ राज्यमंत्री असणारे शिवाजी कर्डिले यांचा 2019 मध्ये प्राजक्त तनपुरे यांनी पराभव केलेला आहे. शिवसेनेचे अनिल राठोड यांना देखील 2014 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी नगर शहरातून सलग पाच वेळा प्रतिनिधित्व केले. ते काही काळ पुरवठा राज्यमंत्री होते. राहुरी मतदारसंघातून 1980 ते 1999 पर्यंत सलग पाच वेळा विजयी झालेले प्रसाद तनपुरे यांना 2004 व 2009 मध्ये पराभव पत्करावा लागला आहे.
गोविंदराव आदिक श्रीरामपूर मतदारसंघातून 1972 व 78 मध्ये विजयी झाले होते. 1980 मध्ये ते श्रीरामपूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर या दोन मतदारसंघांतून निवडणूक रिंगणात होते. श्रीरामपूरमध्ये भानुदास मुरकुटे यांनी त्यांचा पराभव केला. मात्र, वैजापूर मतदारसंघातून ते विजयी झाले होते. 1990 मध्ये पुन्हा त्यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली. परंतु जनता दलाचे उमेदवार मुरकुटे यांनी त्यांचा पराभव केला होता.
के. बी. रोहमारे, बाबूराव भारस्कर, मोहनराव गाडे, पी.बी. कडू, यशवंतराव भांगरे, भानुदास मुरकुटे, वकीलराव लंघे, तुकाराम गडाख, दादा पाटील शेळके, विजयराव औटी, प्रा. राम शिंदे, शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड आदींचाही विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झालेला आहे.