श्रीगोंदा : शिवसेना (उबाठा) उपनेते तथा श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक साजन पाचपुते हे बाजार समितीच्या बैठकीस सलग तीन वेळा गैरहजर राहिल्याने संचालक मंडळाने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. बैठकीस उपस्थित असणार्या सतरा संचालकांनी या कारवाईस एकमुखी पाठिंबा दर्शविला, अशी माहिती सभापती अतुल लोखंडे यांनी दिली.
श्रीगोंदा बाजार समितीत अठरा संचालक असून, माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाची सत्ता आहे. दहा संचालक जगताप गटाचे, तीन संचालक नागवडे गटाच, चार संचालक पाचपुते गटाचे, तर एक संचालक शिवसेना उबाठा गटाचा असे पक्षीय बलाबल आहे.
बाजार समितीच्या सभागृहात सभापती अतुल लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या सभेत साजन पाचपुते यांचे संचालक पद रद्द करण्याबाबतचा विषय होता. पाचपुते 25 ऑक्टोबर व 27 डिसेंबर 2024 आणि 25 फेब्रुवारी 2025 अशा सलग तीन मासिक सभांना गैरहजर राहिले होते. त्यांचे संचालक पद रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
सभापती अतुल लोखंडे, उपसभापती मनीषा मगर, दीपक भोसले, दत्तात्रय पानसरे, भास्कर वागस्कर, महेश दरेकर, बाबासाहेब जगताप, रामदास झेंडे, अंजली रोडे, नितीन डुबल, अजित जामदार, दत्तात्रय गावडे, आदिक वांगणे, प्रशांत ओगले, लक्ष्मण नलगे, लौकिक मेहता, किसन सिदनकर हे संचालक बैठकीस उपस्थित होते.
साजन पाचपुते यांनी विधानसभा निवडणुकीत माजी आमदार राहुल जगताप यांना उमेदवारी मिळू न देण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती. दुसरीकडे अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे यांचा शिवसेनेत प्रवेश करवून घेत अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळवून दिली होती. मात्र निवडणूक काळात पाचपुते प्रचारात कुठेच दिसले नाहीत. ही बाब नागवडे गटालाही खटकत होती. पाचपुते यांचे पद रद्द करण्याच्या ठरावाला नागवडे गटाच्या संचालकांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यावरूनच या कारवाईला विधानसभा निवडणुकीची किनार असल्याचे बोलले जात आहे.
साजन पाचपुते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की माझ्यावर करण्यात आलेली कारवाई बोगस असून, या कारवाईला मी आव्हान देणार आहे.