आ. प्राजक्त तनपुरे Pudhari
अहिल्यानगर

दंड थोपटण्याऐवजी चर्चेला यायला हवे होते ! : तनपुरेंचा घणाघात

; सांगता सभेत कर्डिलेंवर निशाणा

पुढारी वृत्तसेवा

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी 10 वर्षाच्या आमदारकीच्या काळात विकास कामे केली असती तर राहुरी शहरातील शनि मंदिरापुढे दंड, मांड्या थोपटण्याऐवजी त्यांंनी माझे आव्हान स्वीकारून विकास कामे सांगण्यासाठी समोरासमोर चर्चेला आले असते, अशी टीका करतानाच माझा हिंदू धर्म जीवदान द्यायचे शिकवतो, मी कोरोनात केलेल्या कामाचे मला समाधान आहे. मात्र विरोधकांवरील दाखल गुन्ह्यांची पडताळणी करा, त्यातील पिडीत हे सर्व हिंदुच होते, असा घणाघातही आ. प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिले यांच्यावर केला.

राहुरी येथील जुन्या ग्रामिण रुग्णालयासमोर आयोजित प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. व्यासपिठावर माजी खा. प्रसाद तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, काँग्रेसचे रावसाहेब चाचा तनपुरे, सेनेचे जिल्हा प्रमुख पै. रावसाहेब खेवरे, प्रेरणा पतसंस्थेचे सुरेश वाबळे, हर्ष तनपुरे, माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, जि.प. माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, गोविंद मोकाटे, अमोल जाधव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठाणचे जिल्हा अध्यक्ष विजय तमनर, केरू पानसरे, दत्तात्रय अडसुरे, गंगाधर जाधव, सचिन म्हसे, संभाजी तनपुरे, पंढरीनाथ पवार, लखुनाना गाडे, ताराचंद गाडे आदींची उपस्थिती होती.

आ. तनपुरे म्हणाले की, स्व. शिवाजीराजे गाडे यांनी मला साथ देण्याचा शब्द दिला. त्यांच्या निधनानंतर त्यांचा शब्द पाळत शेतकरी मंडळाने साथ दिली. आजही स्व. गाडे यांचे खरे समर्थक माझ्या विजयासाठी झटत आहे. 2019 मध्ये आमदार झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राज्यमंत्री पद दिले. परंतु सत्तेची मस्ती कधीच डोक्यात जाऊ न देता मतदारांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली. जितके शक्य होईल तितके प्रश्न सोडविण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. कोरोना कालखंडात मतदार संघाची नव्हे तर राज्यभरात ऑक्सिजन पुरवठा करण्याचा प्रयत्न केला. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जागतिक पातळीला नावलौकिक कामे करीत साथ दिली. सत्ता काळात कधीच कोणावर अन्याय केला नाही. गणेगाव ग्रामस्थ माझ्या विरोधात जिंकून आले. त्यांच्यावर पोलिस ठाण्यात कारवाई होत असताना गुन्हे दाखल होऊ दिले नाही. खुन्नशीचे राजकारण कधीच केले नाही. माझा हिंदू धर्म हा जीवदान देणारा आहे, कोणाचा जीव घेणारा नाही हे मला कळते. त्यामुळे कधीच कोणाचे नुकसान केले नाही. मिरी परिसरात महार वतन जमिन बळकावणार्‍यांचा सत्ता काळात बंदोबस्त करू. शेतकरी, महिला व बेरोजगार तरुणांना न्याय देणारे व स्वच्छ, पारदर्शक काम करणारे शासन म्हणून महाविकास आघाडी शासनाची सत्ता येणारच असल्याचा दावा आ. तनपुरे यांनी केला.

याप्रसंगी चाचा तनपुरे यांनी कर्डिलेंनी नेहमीच राहुरीकरांना सापत्न वागणूक दिली. त्यामुळेच विकास मंडळ आ. तनपुरेंना पाठबळ देणार आहे. कर्डिले राहुरीत दहशत असल्याचा खोटा आरोप करीत आम्हाला गुंड संबोधले. 15 वर्ष आमच्या नावे राजकारणाची पोळी भाजली तेव्हा आम्ही गुंड वाटलो नाही का? असा प्रश्न चाचा तनपुरे यांनी केला.

पै. खेवरे म्हणाले की, महाविकास आघाडीची सत्ता येणारच आहे. सत्ता जाणार असल्याने महायुतीने जाती-पातीवर मते मागण्यास प्रारंभ केला. महाविकास आघाडी शासन काळात पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणारच असा दावा खेवरे यांनी केला.

याप्रसंगी डॉ. संजय भळगट, मच्छिंद्र सोनवणे, मच्छिंद्र गाडे, विश्वास पवार, प्रथमेश नवले, नाथाभाऊ चव्हाण, वर्षाताई बाचकर, रघुनाथ झिने सर, प्रविण खाटेकर, तमनर, अभिजित ससाणे, बाळासाहेब जठार, सुरेश लांबे, अ‍ॅड. अभिषेक भगत, प्रकाश देठे, कुंडलिक मचे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महिला जिल्हाध्यक्षा वर्षाताई बाचकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. जनता दल व पँथर रिपब्लीकन पार्टीकडून पाठींबा देण्यात आला. याप्रसंगी सागर तनपुरे, मंदार धुमाळ, प्रभाकर म्हसे, सुनिल अडसुरे, सचिन भिंगारदे, महाराष्ट्र केसरी पै. गुलाब बर्डे, मधुकर पवार, रामदास बाचकर, आण्णासाहेब सोडनर, श्रीराम गाडे, नानासाहेब गाडे, विजय गायकवाड, गोरक्षनाथ डोईफोडे, निलेश जगधने, पिंटू साळवे, विलास तनपुरे, अ‍ॅड. राहुल शेटे, प्रदिप भुजाडी, संजय म्हसे आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

अपेक्षापूर्ती केल्याचे समाधान ः डॉ.उषाताई तनपुरे

मी 2019 साली माझ्या प्राजक्तला पदरात घ्या, म्हटल्यानंतर मतदार संघाने साथ दिली. आमदार व नामदार झाल्यानंतर प्राजक्तने प्रत्येक गावात विकासगंगा पोहचविल्याचे समाधान आहे. मला नक्कीच खात्री आहे की मायबाप जनता त्यांना पुन्हा संधी देईल, असा विश्वास डॉ. उषाताई तनपुरे यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT