महिला सरपंच  Pudhari
अहिल्यानगर

महिला सरपंच नावाला अन् पती गाव कारभाराला’; पतीराजांचा राज्यकारभारात वाढता हस्तक्षेप

अकोले तालुक्यात पतीराजांचा ग्रामपंचायतीत वाढतोय हस्तक्षेप

पुढारी वृत्तसेवा

राज्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणामुळे महिला सरपंचपदावर आरूढ झाल्या, परंतु, अकोले तालुक्यात बहुतांशी ग्रामपंचायतीत महिला सरपंचांच्या कारभारात पतींचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. सरकारने हे रोखण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला असला तरीही अकोले तालुक्यातील अनेक गावातील ग्रामपंचायतींचा कारभार हा सरपंच पतीच चालवत असल्याचे चित्र आहे.

अकोले तालुक्यात 143 ग्रामपंचायती आहेत. यातील सुमारे 72 गावात ‘महिला’ सरपंच आहेत, मात्र बहुतांश ठिकाणी महिला सरपंचांच्या कामात त्यांचे पती सर्वत्र सर्रासपणे लुडबुड करताना दिसतात. अकोलेच नव्हे तर राज्यातही हा प्रकार पुढे आला होता. त्यामुळे राज्य शासनाने एक आदेश काढून महिला सरपंचांच्या कामात पती अथवा इतर नातेवाइकांचा हस्तक्षेप चालणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु तरीही आजही अनेक गावात महिला सरपंचांच्या अधिकारावर गदा आणून पतीदेवाचा राजरोसपणे हस्तक्षेप सुरू असल्याचे अकोलेत दिसत आहे. परिणामी ‘महिला सरपंच नावाला आणि पतीदेव गावाच्या कारभाराला’ अशी परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे. अनेक ग्रामपंचायतीत सरपंच पदी हे कर्मचार्‍यांना दमदाटी करणे, बारीक बारीक चुका काढून टोमणे मारणे, या त्रासाला कंटाळून कामगार कामाला येण्यासाठी टाळाटाळ करू लागले आहेत.

गटविकास अधिकारी लक्ष देतील काय?

विशेष म्हणजे, ग्रामसेवकांनी सरपंचांनी पती यांना समज देणे गरजेचे आहे; परंतु, तसे होताना दिसत नाही. कर्मचार्‍यांना उद्धट वागणूक देत असताना ग्रामसेवक यांच्याकडून कोणताही विरोध करण्यात येत नाही, त्यामुळे यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी जनसामान्यांतुन होऊ लागली आहेत. त्यामुळे याकडे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लक्ष देतील का, असा सवाल नाव न छापण्याच्या अटीवर काही नागरिकांनी केला.

शासनाच्या आदेशाला केराची टोपली

सरपंचांचा त्याच्या गावात वेगळाच तोरा असतो. एक वेगळाच सन्मान असतो. मात्र, महिला सरपंच असल्यास कामकाजामध्ये बर्‍याचदा त्यांच्या पतीचा अथवा इतर नातेवाइकांचा हस्तक्षेप कायम असतो. पदाधिकार्‍यांच्या कार्यालयांमध्ये नातेवाइकांनी मुळीच बसता कामा नये, असेही सरकारी आदेशात म्हटले आहे; परंतु, अनेक गावा-गावातील पदाधिकारी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT