दिवसेंदिवस पारनेर तालुक्यातील बिबट्यांची संख्या लक्षणीय वाढली असून, भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्यांकडून आता मानवी वस्त्याही लक्ष्य केल्या जाऊ लागल्या आहेत. असाच भक्ष्याच्या शोधात निघोजच्या लामखडे वस्तीवर आलेला बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला असून, वन विभागाचे कर्मचारी त्यास जेरंबद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार निघोजच्या कुंड परिसरातील कोळीवाडा हॉटेलमागे गणेश लामखडे यांची शेती आहे. या शेतीमधील उसाच्या फडालगत असलेल्या खुराड्यातील कोंबड्यांना बिबट्याने सोमवारी (दि. 2) रात्रीच्या सुमारास लक्ष्य केले. कोंबड्या फस्त केल्यानंतर खुराड्यात उतरलेल्या बिबट्याला बाहेर पडणे मुश्किल झाले. तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याचे प्रयत्न अपुरे पडले.
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या असल्याचे लामखडे परिवारातील सदस्यांच्या मंगळवारी सकाळी लक्षात आले. या संदर्भात वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे यांना माहिती देण्यात आल्याने वन विभागाचे अधिकारी, तसेच कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे, वनपाल रेश्मा पाठक, वनरक्षक संदीप कार्ले, तसेच साबळे, शेख, सातपुते, वाढवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्यासाठी बचाव पथकाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी संगमनेर येथून बचाव पथक पाचारण करण्यात आले. दुपारी चार ते पाच दरम्यान पथकाने बिबट्याला गुंगेचे इंजेक्शन देऊन पिंजर्यात अडकवले. कुंड परिसरात, तसेच शेजारील वस्तीवर गेल्या पंधरा दिवसांत बिबट्याने शंभरपेक्षा जास्त कोंबड्या, पंचवीसपेक्षा जास्त कुत्रे, शेळ्या फस्त केल्या आहेत. या परिसरात वस्तीवर दोन ते तीन बिबटे असून, त्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.