श्रीगोंदा : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याप्रमाणे माझ्यावरही जनतेने विश्वास टाकून काम करण्याची संधी दिली. त्यामुळे तालुक्यात विकासकामांसाठी कधीही कमी पडणार नाही. जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, तसेच आपला कार्यकर्ता सक्षम बनवायचा असल्याने पाच वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थेसह सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांना ताकद देऊ, अशी ग्वाही आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी दिली.
आढळगाव जिल्हा परिषद गटात आभार दौर्यावेळी कोकणगाव येथे ते बोलत होते.यावेळी कोकणगावचे ज्येष्ठ नेते संभाजी जामदार, माजी पंचायत समिती सदस्य हौसराव भोस, रमेश गिरमकर, महेश दरेकर, तालुकाध्यक्ष संदिप नागवडे, बाळकृष्ण महाराज महाडिक, माजी सरपंच सुरेश शेंडगे, सतीश जामदार, सतीश रजपूत, युवानेते सचिन भोस, शेंडगे महाराज आदी उपस्थित होते.
आ. पाचपुते म्हणाले की, माझ्यावर मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात जनतेने विश्वास टाकून निवडून दिले आहे. त्यामुळे गावोगावी जनतेचे आभार मानण्यासाठी आलो आहे. आपण मला दिलेल्या जबाबदारीमधुन मी विकास कामासाठी कुठेच कमी पडणार नाही. ज्या गावातील रस्ते राहिले आहेत, त्याचे प्रस्ताव तातडीने पाठवा, मंजूर करुन घेण्याची जबाबदारी माझी आहे, असा विश्वासही त्यांनी दिला. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा विकासाचा वारसा मी पुढे चालुच ठेवणार आहे. त्यांना आपण कामासाठी विनंती करत होतात, पण मी वयाने लहान असून मला विनंती नाही, तर आदेश देऊन कामे सांगत जा, असे आमदार पाचपुते म्हणाले. पाच वर्षांत कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करणार आहे. आपला कार्यकर्ता सक्षम बनवायचा आहे. निवडणुकीत कोणी काय केले, याचे चिंतन करण्यापेक्षा गावासाठी तालुक्यासाठी काय करावे लागेल याचे चिंतन करायचे आहे, असेही आ. पाचपुते म्हणाले.
कोकणगाव येथे एका चिमुकल्याने ‘दादा’ आम्हाला पिण्यासाठी हातपंप आहे पण पाणी मिळत नाही, असा प्रश्न आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडे मांडला. त्यावर आमदार यांनी तत्काळ हातपंप दुरुस्त करण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकार्यांना सुचना दिल्या.