तलावाची दुरवस्था Pudhari
अहिल्यानगर

नगरकरांची तहान भागविणार्‍या तलावाची दुरवस्था!

बेसुमार पाणीउपसा, वृक्षतोड, तळीरामांचा अड्डा, घाणीचा विळखा, भरावावर बाभळींचे साम्राज्य, अतिक्रमणाचा प्रश्न!

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत पवार

ब्रिटिशकालीन सुमारे 108 वर्षीय तलावाची महापालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे अत्यंत दुरवस्था झाली असून, तलाव परिसरात बेसुमार अवैध पाणीउपसा... मोठ्या प्रमाणात वृक्षतोड... अवैध गौण खनिज उत्खनन...तळिरामांचा अड्डा... घाणीचा विळखा... भरावावर बाभळींच्या झाडांचे साम्राज्य तर येथे राहणार्‍या आदिवासी समाजाच्या अतिक्रमणाचा प्रश्न यामुळे पिंपळगाव माळवी तलावाचे खूपच विदारक चित्र पहावयास मिळत आहे. अनेक वर्ष नगरकरांची तहान भागविणार्‍या तलावाच्या दुरवस्थेला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपळगाव माळवी तलाव ब्रिटिशांच्या राजवटीत सन 1916मध्ये तयार करण्यात आला होता. त्यानंतर 1922पासून नगर शहराला पाणीपुरवठा करण्याची सोय तलावातून करण्यात आली होती. अनेक वर्ष पिंपळगाव माळवी तलावाने शहरवासीयांची तहान भागवली. परंतु मुळा धरणातून शहरासाठी जलवाहिनी आल्यानंतर येथूनच पिंपळगाव माळवी तलावाला उतरती कळा लागली. तलावाकडे दुर्लक्ष झाले. सुमारे सातशे एकर क्षेत्रावर असलेल्या पिंपळगाव माळवी तलावाच्या तीरावर मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे.

शिंदे सरकारच्या नावाने असलेल्या सात-बारा उतार्‍यावर येथील आदिवासी समाजाने हक्क सांगितला होता. ही जागा संपूर्णतः महापालिकेच्या नावावर करण्यात आली आहे. येथील आदिवासी समाजाने शासन दरबारी मोठा लढा दिला. मनपाच्या नावावर पिंपळगाव तलावाचा मालकी हक्क झाल्याने तलावाचे रूपडे पालटण्याची मोठी अपेक्षा नागरिकांना होती. येथील क्षेत्रावर विविध उपक्रम अंमलात आणण्याचा मानस अनेक पदाधिकार्‍यांनी केला. परंतु त्यासाठी म्हणावे असे प्रयत्न केले गेले नाहीत. त्यामुळे तलावाची खूपच दयनीय अवस्था झाली आहे.

तलावात राहणार्‍या आदिवासी समाजाच्या बंडाची इतिहासात नोंद आहे. पिंपळगाव तलावातून आजमितीला जेऊर, धनगरवाडी, डोंगरगण, पिंपळगाव माळवी, मांजरसुंभा गड या गावांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे. परंतु तलावातून होत असलेल्या बेसुमार पाणी उपशामुळे परिसरातील गावांसमोर उन्हाळ्यात मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. महापालिकेच्या नावावर तलाव केला असला, तरी अद्यापपर्यंत तलावाची हद्दही निश्चित करण्यात आलेली नाही. तलावात आज अनेक आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहेत. तलावाच्या तीरावरील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेती देखील पिकवली जात आहे.

तलावाची निर्मिती व पंपिंग स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केल्याबाबतची तारीख तेथील शिलालेखांवर आजही स्पष्टपणे दिसून येते. येथील भिल्ल समाजाचे बंड, चक्रधर स्वामींचे विसावा घेण्याचे ठिकाण या घटनेची इतिहासामध्ये नोंद आढळते. पवित्र सीना नदीवर बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक तलावाची आजची झालेली दयनीय अवस्था ही फक्त महापालिकेच्या उदासीन भूमिकेमुळेच झाल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

आदिवासी समाज पुनर्वसनासाठी पुढाकार

येथे पिढ्यान पिढ्या वास्तव्यास असणारा आदिवासी समाज व महापालिका प्रशासन यांच्यामध्ये भविष्यात वाद चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे येथील आदिवासी समाजाचे पुनर्वसन अथवा त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.

हद्द निश्चित करून तलावाचे सुशोभीकरण गरजेचे

पिंपळगाव माळवी तलावावर महापालिकेचा मालकी हक्क आहे. परंतु येथे सुरू असलेला बेसुमार पाणीउपसा, वृक्षतोड, अतिक्रमण, तळिरामांकडून परिसराचे होत असलेले विद्रुपीकरण, तलावाला बाभळींचा वेढा अशी विदारक परिस्थिती पाहावयास मिळत आहे. महापालिकेने तलावाची हद्द निश्चित करून तलावाचे सुशोभीकरण करावे, तसेच येथे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसाठी उपक्रम राबवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT