नगर: बळजबरीने शरीरसंबंध ठेवून अल्पवयीन मुलीस गर्भवती केल्याप्रकरणी दोषी आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी तसेच 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास दोन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली.
शिरीष उर्फ मुन्ना भाउसाहेब कावले (रा.कावले वस्ती,शहरटाकळी,शेवगाव) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी ही शिक्षा सुनावली. (Latest Ahilyanagar News)
शिरीष उर्फ मुन्ना भाउसाहेब कावले याने घरात एकटी असताना पिडितेशी बळजबरी करून शारीरीक संबंध केले. त्यातून ती गर्भवती राहिल्याची फिर्याद पिडितेच्या आईने शेवगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून भा.द.वि. कलम 376 (1) (2) (जे) (एन), 452, 506 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम 3,4,5 (2) (एल) 7 व 8 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
खटल्याची हकीगत अशी, आईवडील शेतात कामावर गेल्याने पिडिता एकटीच घरी होती. आरोपी शिरीष उर्फ मुन्ना भाउसाहेब कावले पाणी पिण्याच्या निमित्ताने घरी आला. पिडीतेला बळजबरी करू लागला, त्यावेळी पिडीतेने नकार दिला असता,‘ मला तू खूप आवडतेस, तुझ्यासोबत लग्न करायचे आहे.
तू जर माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी तुला व तुझे आईवडीलांना जीवे मारून टाकीन, अशी धमकी देत त्याने पिडीतेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध केले. पिडीत एकटी घरी असताना आरोपी नेहमी घरी यायचा व बळजबरीने शरीर संबंध करत धमकी देवून निघून जायचा.
आरोपीच्या धमकीला घाबरल्याने पिडितेने आई वडीलांना काही सांगितले नाही. पोट दुखू लागल्याने तपासणीनंतर ती गर्भवती असल्याचे समोर आले. पोलिसांनी जबाब घेतल्यानंतर पिडितेची जिल्हा शासकीय रुग्णाल्यात तपासणी केली. पिडीत मुलीचे वय कमी असल्याने पिडीतेचा गर्भपात करण्यात आला.
सरकार पक्षातर्फे 18 साक्षीदार तपासण्यात आले. अल्पवयीन पिडीत, तिची आई, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके तसेच वयासंदर्भात मुख्याध्यापक, शेवगाव पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी भारत चौरे त्याचबरोबर पिडीतेच्या उपचारासंबंधात शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमावत, डॉ. दुवाडा तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पगारीया, डॉ. घुगरे, डॉ. उंदरे, डॉ. मंगेश राउत, डॉ. स्नेहल इंगळे यांची साक्ष नोंदविण्यात आली. पिडीत मुलीच्या गर्भाच्या अंशाच्या चाचणीबाबत नाशिक वैद्यकीय प्रयोगशाळा येथील रासायनिक अधिकारी मारूती घुगे यांची साक्ष नोंदविण्यात आली.
पिडीत मुलगी घटनेवेळी केवळ 16 वर्षाची होती. आरोपीचे वय 38 वर्ष होते. आरोपीचे लग्न झालेले असताना देखील त्याने पिडीत मुलीवर बळजबरी करून तिला धमकी देत गर्भवती केलेले आहे. पिडीत मुलीवर कमी वयामध्ये गर्भपात करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तिच्या शरीरावर गर्भपाताच्या शस्त्रक्रियेच्या खुणा आढळून येतात, त्यामुळे तिच्या भविष्यावर या गोष्टीचा परिणाम होणार आहे.
आरोपीने वाईट पध्दतीने हे कृत्य केले असून त्यास जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी, असा युक्तीवाद सरकारी वकिल मनिषा पी. केळगंद्रे/शिंदे यांनी केला. तो युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी महिला पोलिस रेश्मा अडसूळ, शेवगावचे हवालदार अशोक बेळगे, तसेच मूळ फिर्यादीतर्फे अॅड. नार्दन एकलहरे यांनी सरकारी वकिलास सहकार्य केले.