नगर: मागील वार्षिक सभेत बँकेचे कार्यक्षेत्र 5 जिल्ह्यास वाढविण्यासाठी सहकार खात्याची मान्यता मिळाली. हा प्रस्ताव आरबीआयकडे पाठवला असता, त्यांनी पोटनियम क्र. 10 दुरुस्त करणे बाबत सुचविलेले आहे. त्यामुळे रविवारी दि. 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवण्यात आला आहे.
शिक्षक बँक शेड्युल व्हावी, या उद्देशाने व भविष्यात कर्जाचा व्याजदर आणखी कमी व्हावा, यासाठी हा पोट नियम दुरुस्ती गरजेची आहे. सभासदांनी अभ्यास करून याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहनही संस्थेच्या अध्यक्षा सरस्वती घुले यांनी केले आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला सन 2025-26 आर्थिक वर्षात 7 कोटी 96 लाख 14 हजार 96 रुपये इतका निव्वळ नफा झाला असून त्यातून आवश्यक त्या तरतुदी वजा जाता सभासदांना 6.10 टक्के प्रमाणे लाभांश वार्षिक सभेच्या मंजुरीनंतर देण्यात येणार आहे.
डिजीटल बँकींगमध्ये घोडदौड
सभासदांच्या कायम ठेवीवर यापूर्वीच 7 टक्के प्रमाणे 15 कोटी 45 लाख 92 हजार 682 रुपये व्याज सभासदांच्या खात्यावर दि.31 मार्च 2026 रोजीच जमा केलेले आहे. या वर्षात बँकेने यूपीआय व मोबाईल बँकिंग सेवा सुरू करून बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार डिजिटल सुरू केले आहे, अशी माहितीही घुले यांनी दिली.
कर्जावरील व्याजदरात कोणतीही वाढ नाही
रविवारी शिक्षक बँकेची 107 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्यांनी अहवाल सालात बँकेच्या कर्जावरील व्याजदरात कोणतीही वाढ न करता शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, जामीन कर्ज यांचा पूर्वीप्रमाणेच व्याजदर ठेवून जवळपास आठ कोटींचा विक्रमी नफा मिळवला.
बापूसाहेब तांबेंच्या नेतृत्वात
गेल्या नऊ वर्षापासून संचालक मंडळाने कोणत्याही कर्जावरील व्याजदरात वाढ केलेली नाही. गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचा सभासद हिताचा कारभार सुरू असून, तो यापुढेही सुरू राहील, अशी ग्वाही शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष शिवाजी कराड यांनी दिली.
याप्रसंगी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, दत्ता पाटील कुलट, अर्जुनराव शिरसाठ, बाबासाहेब खरात, विद्याताई आढाव, राजेंद्र शिंदे, गोकुळ कळमकर, राजेंद्र सदगीर, शरद सुद्रिक, साहेबराव अनाप, सलीमखान पठाण, राजेंद्र कुदनर, गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष दुसुंगे, संघाचे जिल्हाध्यक्ष बबनदादा गाडेकर, राजेंद्र ठोकळ, नारायण पिसे, प्रकाश नांगरे, विकास मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, संतोष आंबेकर, प्रदीप दळवी, बाळासाहेब कापसे, राजेंद्र निमसे, बाळासाहेब कदम, शरद वांढेकर, प्रदीप चक्रनारायण आदी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेला बाळासाहेब तापकीर, योगेश वाघमारे, संदीप मोटे, रामेश्वर चोपडे, गोरक्षनाथ विटनोर, कैलास सारोक्ते, निर्गुणा बांगर, अण्णासाहेब आभाळे, शशिकांत जेजुरकर, माणिक कदम, ज्ञानेश्वर शिरसाठ, कारभारी बाबर, महेंद्र भणभणे, कल्याण लवांडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जगताप, गणेश पाटील आदी उपस्थित होते.
सभा शेवटपर्यंत चालवणार
वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या सर्व शंका निरसन झाल्याशिवाय सभा संपणार नाही. सर्वांना बोलण्याची संधी दिली जाईल. सभासदांनी आपले प्रश्न मांडावेत आणि त्यावर साधक बाधक चर्चा होऊन वार्षिक सभेमध्ये योग्य ते निर्णय व्हावा, व बँकेची सर्वसाधारण सभा शांततेत पार पाडावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.