टाकळीभान: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पुर्वसंध्येला येथील दोन कुटुंबात जागेवरुन तणाव निर्माण झाल्याने याबाबतचा वाद थेट श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यापर्यत गेल्याने बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, सागर गायकवाड व इतर पाच ते सहा इसमांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील एका महिलेने श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, दि. 13 एप्रिल रोजी रात्र 8.20 वाजेच्या सुमारास गावातील काही महिला ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वाचनालय सुरु करायचे असल्याने महाराष्ट्र बँके शेजारच्या एका रुमची साफसफाई करीत होत्या. त्यावेळी मयुर अशोक पटारे, सागर भगवान गायकवाड व इतर अनोळखी सहा ते सात ईसम तेथे आले.
त्यापैकी पटारे व गायकवाड यांनी तुम्ही येथे वाचनालय सुरु करायचे नाही, असे म्हणून अर्वाच्च भाषेत जातीवाचक शिविगाळ करुन गावठी कट्यासारखे हत्यार व चाकु दाखवून धमकी दिली. तसेच फिर्यादीची साडी ओढुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
वरीलप्रमाणेच्या फिर्यादिवरुन श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्यात अनु. जाती जमातीचे कायदा व इतर कलमानुसार मयूर पटारे, सागर गायकवाड यांसह पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागिय पोलिस आधिकारी भवर हे आधिक तपास करीत आहेत.
तर श्रीरामपुर शहर पोलिस ठाण्यातही हरेगाव फाटा येथील 38 वर्षीय महिलेनेही एक गुन्हा दाखल केला आहे. पो.हे.काँ. शेलार हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, ॲट्रोसीटीच्या गुन्ह्यानंतर तालुक्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. त्यामुळे हा विषय तालुक्यात चर्चेचा दिसला.