जलजीवन मिशन योजनेबाबत कामकाजात संथपणा सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापणाच्या वाढत्या तक्रारींची दखल घेणे गरजेचे आहे. जलजीवन मिशन योजनेबाबत संसदीय अधिवेशनामध्ये प्रश्न मांडत जबाबदार लोकांवर कारवाईची मागणी करू, असा इशारा खा. नीलेश लंके यांनी दिला. दरम्यान, अधिकार्यांनी जतनेच्या तक्रारींचा निपटारा करावा, दर महिन्याला जनता दरबार घेऊन प्रशासनाने किती तक्रारी मार्गी लावल्या याची माहिती घेवू, अशा सूचना खा. नीलेश लंके यांनी केल्या.
राहुरी पंचायत समिती सभागृहामध्ये आयोजित शासकीय कामकाजाच्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकारी, जनतेशी संवाद साधला. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, सेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, सचिन म्हसे, तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार सचिन औटी, संध्या दळवी, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, गट शिक्षणाधिकारी मोहनीराव तुंभारे, तालुका आरोग्य अधिकारी वर्षा गायकवाड, तालुका कृषी अधिकारी बापुसाहेब शिंदे, राजू भाऊ शेटे, रामदास बाचकर, बाबासाहेब भिटे, मच्छिंद्र सोनवणे, रविंद्र आढाव, बाबासाहेब खुळे, प्रभाकर गाडे, विश्वास पवार, किशोर कोहकडे, डॉ. ज्ञानेश्वर आघाव, सचिन भिंगारदे, सुनिल कोकरे, प्रकाश देठे, किरण कडू आदी उपस्थित होते.
याप्रसंगी राहुरी परिसरामध्ये कार्यरत बहुतेक अधिकार्यांच्या कामकाजावर खा. लंके यांनी समाधान व्यक्त केले. तर वन विभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त झाली. त्यामुळे वन विभागाने हलगर्जीपणा दाखवू नये, असा इशाराही दिला. यावेळी कृषी विभागाबाबत तसेच कृषी योजनांबाबत शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली. राहुरी येथे अनेक बस थांबत नसल्याने तसेच लोकल गाड्यांबाबत परिवहन विभागाशी संपर्क साधला आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महसूल, पोलिस या प्रशासनाबाबतही तक्रारी मांडण्यात आल्या.
वांबोरी ग्रामिण रुग्णालयाच्या कामकाजाबाबत बैठकीत तक्रार मांडण्यात आली. वैद्यकीय अधिकारी सतिष लोंढे यांना पाहताच खा.लंके यांनी वांबोरी ग्रामिण रुग्णालयाचे काम लवकरच चांगले होईल, असे सांगितले. डॉ. लोंढे यांनी पारनेर येथे कोव्हिड रुग्णालयात 24 तास रुग्णसेवा केली. त्यांना पदभार घेऊन काही महिने झाले असून ते आगामी काळात चांगले काम करणारच असे खा. लंके यांनी सांगितले.