संगमनेर: तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून येलो आणि ग्रीन झोनमधील जमिनींचे बेकायदेशीर तुकडे पाडल्याप्रकरणी दोन मंडलाधिकारी आणि चार तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत अकरा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असली तरी अधिकार्यांना मात्र अभय दिल्याने तो चर्चेचा विषय ठरत आहे.
मंडलाधिकारी बाबाजी जेडगुले (समनापुर) व इराप्पा काळे (साकुर), तलाठी रोहिणी कोकाटे, आलोकचंद्र चिंचुलकर, धनराज राठोड, वैद्य या सहा महसूल कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वीही अशीच कारवाई करून पाच जणांचे निलंबन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. (Latest Ahilyanagar News)
जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या कायद्याचे (अधिनियम 1147) उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात लहान तुकड्यांमध्ये जमिनीचे विभाजन करण्यास मनाई असताना महसूल कर्मचार्यांनी ग्रीन झोनमधील जमिनींचे बेकायदेशीर तुकडे पाडले आणि नियमांचे उल्लंघन करून रेखांकन केले, तसेच कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही, असा आरोप ठेवण्यात आला आहे.
या कारवाईमुळे महसूल विभागात असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणात काही अधिकार्यांचा सहभाग असण्याच शक्यता आहे. त्यांच्या परवानगीशिवाय असे उद्योग होऊ शकत नाही. मात्र तरीही त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना वगळण्यात आल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.