अहिल्यानगर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे महानगरपालिकेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. याद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्तांची, इमारतींची, घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे. मार्च अखेरीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सर्व्हेक्षण करताना अडचणी येत आहेत. नागरिकांनी सर्वेक्षण करणार्या खासगी संस्थेच्या कर्मचार्यांना सहकार्य करावे. त्यांच्याकडे ओळखपत्र असून ते तपासून त्यांना सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी गुरुवारी महानगरपालिकेत सर्वेक्षणाचा आढावा घेतला. अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील सर्व जमीन व इमारती यांचे सर्वेक्षण करुन आवश्यक माहिती संकलित करणे, मूल्यांकन व आवश्यक तांत्रिक सेवा संगणकीकरण करणे, विविध आज्ञावली विकसित करून इतर कामे करणे, यासाठी निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाकडून मे. सी. ई. इन्फो सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड यांना कार्यारंभ देण्यात आला आहे. मालमत्तेची डिजीटल छायाचित्रे, जिओ टॅगिंग, तसेच मालमत्तेच्या अंतर्गत मोजमापांसाठी, त्यांचे कारपेट व बिल्टअप क्षेत्र डीजीटल उपकरणाद्वारे मोजण्यात येणार आहे. महानगरपालिकेचे वसुली लिपिक व मे. सी. ई. इन्फो सिस्टीम लिमिटेड यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत हे काम केले जात आहे. त्यासाठी वसुली लिपिक व वसुली मदतनीस आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
खासगी संस्थेचे कर्मचारी असल्याने काही नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन सर्वेक्षणात अडथळे येत आहेत. मालमत्ताधारकांनी मालमत्ता सर्वेक्षणासाठी येणार्या कर्मचार्यांची ओळख तपासून त्यांना सहकार्य करावे. त्यांना आवश्यक ती माहिती द्यावी. सर्वेक्षणाचे काम हे अहिल्यानगर महानगरपालिका विनामूल्य करीत असून यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सर्वेक्षणामुळे सर्व मालमत्तांना कर आकारणी होईलच. मात्र, यामुळे मालमत्ताधारकांना आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे शक्य होणार आहे. या सर्व्हेक्षणाबाबत अथवा सर्वेक्षण कामास येणार्या कर्मचारी, प्रतिनिधींबाबत कुठलीही तक्रार असल्यास सहाय्यक मूल्य निर्धारक कर संकलन अधिकारी विनायक जोशी यांच्याशी (9822076865) संपर्क करावा असे मनपातर्फे कळविण्या आले.
शहरातील सुमारे एक लाख 20 हजार मालमत्तांचे मोफत सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी मालमत्ताधारकांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. मात्र, सर्वेक्षणासाठी खासगी कंपनी नेमण्यात आली असून, महापालिका कर्मचारी मदतीसाठी नेमले आहेत. त्यांचे ओळखपत्र तपासून त्यांना सर्वेक्षणसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.