अकोले : अगस्ती साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनीता भांगरे यांच्यासह समर्थकांनी मंगळवारी मुंबईत भाजप प्रवेश केला. मंत्री विखे पाटील यांच्या ‘ऑपरेशन लोटस’ला अकोले तालुक्यातून सुरुवात झाली असून त्यांनी पहिला धक्का शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भांगरे यांच्याकडे भाजपतर्फे अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. (Latest Ahilyanagar News)
दीपावली स्नेहमीलनाच्या संगमनेरातील कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यात ‘ऑपरेशन लोटस’चे संकेत दिले होते. त्यानंतर पहिला प्रवेश भांगरे यांच्या रूपाने करवून घेत त्याची सुरुवात अकोले तालुक्यापासून करण्यात आली. स्व. अशोक भांगरे यांच्या निधनानंतर शरद पवारांनी भांगरे कुटुंबीयांना ताकद देत अमित भांगरे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. माजी आमदार वैभव पिचड यांच्यासमवेत अमित भांगरे यांनी मंत्री विखे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर हेच भांगरे सोमवारी शरद पवारांनी बोलावलेल्या मुंबईतील बैठकीला उपस्थित होते. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मातोश्री सुनीता भांगरे यांनी भाजपचा पंचा गळ्यात घातला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भांगरे यांच्यासह समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भांगरे यांच्या भाजप प्रवेशाने मंत्री विखे पाटील यांनी शरद पवारांना पहिला धक्का दिल्याचे मानले जाते.
मुंबईतील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनीता भांगरे, दिलीप भांगरे यांच्यासह अकोले तालुक्यातील अनेक गावांच्या सरपंच आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. आ. चव्हाण यांनी भाजपमध्ये सर्वांचे स्वागत केले. जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे, कोपरगावचे सुहास वहाडणे, विनायक देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेशाचे स्वागत करत ‘तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही’, अशी ग्वाही आ. चव्हाण यांनी या वेळी दिली. ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्राने अहिल्यानगर जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी काम कराल अशी अपेक्षा आ. चव्हाण यांनी व्यक्त केली.
स्व. मधुकर पिचड व स्व. अशोक भांगरे हे राजकीय प्रतिस्पर्धी होते. स्व. भांगरे यांनी तब्बल सहा वेळा विधानसभा निवडणुका लढवल्या; मात्र त्यांना यश आले नाही. स्व. भांगरे हे काही काळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षही होते. पिचड व भांगरे यांची पुढची पिढी असलेल्या वैभव पिचड आणि अमित भांगरे यांनीही एकमेकांविरुद्ध 2024 ची विधानसभा निवडणूक लढविली होती. पिचड-भांगरे या पारंपरिक राजकीय विरोधकांचा हा इतिहास ताजा असतानाच पिचड-भांगरे यांच्यात योग्य समन्वय साधून अकोले तालुक्यातूनच मंत्री विखे पाटील यांनी राजकीय धक्कातंत्राला सुरुवात केल्याचे मानले जात आहे.
सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत व त्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत झालेल्या मुंबईतील बैठकीला उपस्थित असणारे जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष अमित भांगरे यांच्याशी त्यांच्या आईच्या भाजप प्रवेशाबाबत प्रतिक्रियेसाठी ‘पुढारी’ने संपर्क साधला, त्या वेळी ते म्हणाले, “मी पवार, थोरातांसमवेत बैठकीला उपस्थित होतो. आईचा भाजप प्रवेशाचा निर्णय हा व्यक्तिगत आहे. आईच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाशी माझा काहीही संबंध नाही. शरद पवार यांच्या मार्गदर्शनात मी यापुढेही राजकारणात कार्यरत असेन. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हीच माजी भूमिका असेल..”
भांगरे परिवाराने भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल अभिनंदन. आता अकोले तालुका शतप्रतिशत भाजपमय करण्यासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण ठरेल. माजी आमदार वैभव पिचड यांच्या पुढाकारातून झालेला हा प्रवेश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. अकोले तालुक्यातील सर्व गट आणि गणांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी करण्यात कोणतीही कसर बाकी राहणार नाही.राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री