उसाचे आगार अशी ओळख असलेल्या नेवासा तालुक्यात यंदा ऊसतोडणी व ऊसदराची स्पर्धा लागणार आहे. त्यामुळे ऊसासाठी साखर कारखान्याची दमछाक होण्याची शक्यता आहे. यंदा ऊसासाठी सहकारी साखर कारखान्यांनाही संघर्ष करावा लागणार आहे. त्यातच वरखेडचा स्वामी समर्थ व महालगावजवळील पंचगंगा हे खासगी साखर कारखानेही ऊसतोडीसाठी गट कार्यालये सुरू करणार आहेत.
तालुक्यात ज्ञानेश्वर व मुळा हे सहकारी साखर कारखाने असून, या दोन्ही कारखान्यांना यंदा त्यांचे प्रत्येकी बारा ते तेरा लाख मेट्रिक टन ऊस गळीत करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातच माजी मंत्री विजय शिवतारे यांचा वरखेड येथील स्वामी समर्थ शुगर व नेवासा तालुक्यातील खुपटी येथील उद्योजक प्रभाकर शिंदे यांचा वैजापूर तालुक्यातील महालगाव परिसरातील पंचगंगा शुगर हे साखर कारखाने तालुक्यातील उस गाळप करण्यासाठी सरसावले आहेत.
त्यातच जिल्ह्यातील शेवगावचा गंगामाई या खासगी कारखान्यासह पाथर्डीचा वृद्धेश्वर, प्रवरेचा विखे पाटील, संगमनेरचा थोरात, श्रीरामपूरचा अशोक, तसेच कुकडी, श्रीगोंदा, अशा जिल्ह्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या तालुक्यात कार्यरत राहणार आहेत. त्यातच आता स्वामी समर्थ व पंचगंगा यांचीही धुराडी यंदा प्रथमच पेटणार असल्याने ऊस मिळवण्यावरून उसाच्या फडातही दराचा व उस पळवा-पळवीचा संघर्ष दृष्टीस पडण्याची शक्यता आहे. मुळा, भंडारदरा व जायकवाडी अशा तीनही धरणांतील पाणी तालुक्यास मिळते.
त्यात जायकवाडी जलाशय परिसरात आता स्वामी समर्थ व पंचगंगा हे खासगी साखर कारखाने उभारले आहेत. यंदा त्यांचीही चाचणी हंगाम होणार आहेत. त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांची यंदा उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे. ऊसउत्पादकांना यामुळे भाव येणार आहे.
दमछाक शेतकर्यांची आणि कारखान्यांची
यंदा सर्वच कारखाने पंधरा दिवस उशिराने गळीत सुरू करणार आहेत. तालुक्यात अतिरिक्त ऊसउत्पादन असले की ऊस उत्पादकांचे मात्र ऊसाची विल्हेवाट लावताना दमछाक होत असते, तर कमी उत्पादन असतांना साखर कारखान्यांची दमछाक होते.